शाळेची छप्परदुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:41 AM2021-06-16T04:41:16+5:302021-06-16T04:41:16+5:30
कार्यालयांचे निर्जंतुकीकरण साखरपा : साखरपा ग्रामपंचायतीतर्फे गावातील सर्व शासकीय इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना ...
कार्यालयांचे निर्जंतुकीकरण
साखरपा : साखरपा ग्रामपंचायतीतर्फे गावातील सर्व शासकीय इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शासकीय कार्यालयांतून सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
शोभिवंत झाडांची लागवड
दापोली : नगरपंचायतीच्या हद्दीत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा शोभिवंत झाडांची रोपे लावून सुशोभीकरण करण्यात आले. स्वच्छ दापोली, सुंदर दापोली अंतर्गत विविध शोभिवंत झाडे लावण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयाजवळ तसेच शासकीय गोडाउन आदी ठिकाणी ही झाडे लावण्यात आली.
कार्यक्षम यंत्रणा हवी
चिपळूण : पिकांच्या हमीभावात वाढ करून मोदी सरकारने शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यामुळे आघाडी सरकारने कापूस, धान, तूर आदी पिकांच्या खरेदीसाठी कार्यक्षम यंत्रणा तयार करावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केली आहे.
परकार यांची निवड
चिपळूण : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी कादीर परकार यांची निवड करण्यात आली. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते परकार यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी अल्पसंख्याक चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी, सावर्ड्याचे उपसरपंच जमीर मुल्लाजी उपस्थित होते.
नावीन्यपूर्ण लागवड
चिपळूण : तालुक्यात खरीप हंगामात नावीन्यपूर्ण शेतीचे प्रयोग राबविले जाणार आहेत. लोकसहभागातून काळ्या व लाल भाताचे उत्पादन घेण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. लाल भाताचे अडीचशे किलो बियाणे व काळ्या भाताचे १०० किलो बियाणे वाटप करण्यात आले.
विमा संरक्षणाची मागणी
रत्नागिरी : सध्या ग्रामपंचायतस्तरावर विलगीकरण कक्ष उभारण्यात येत आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविणा-या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. कोविडच्या अनुषंगाने त्यांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करून विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
संरक्षक भिंतींची मागणी
राजापूर : राजापूर-शीळ गोठणे, दोनिवडे, सौंदळ रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. संरक्षक भिंत रस्त्यालगत घालून देण्याचे आश्वासन न पाळल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शीळ पंचक्रोशी समितीतर्फे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी निवेदनही देण्यात आले आहे.
लसीकरणाची मागणी
आरवली : कोंडिवरे येथील ग्रामस्थांसाठी लसीकरणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून होत आहे. माखजन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सध्या प्रत्येक उपकेंद्रानुसार लसीकरण सुरू आहे. मात्र, वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
रत्नागिरी : दहावी-बारावीच्या खेळाडूंना राखीव गुण मिळणार आहेत. त्यासाठी बोर्डाने शाळांना प्रस्ताव पाठविण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. २१ जूनपर्यंत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. विभागीय मंडळाकडे २५ जूनपर्यंत क्रीडाधिका-यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन केले आहे.