शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:26 AM2021-05-03T04:26:08+5:302021-05-03T04:26:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दि. १ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दि. १ मेपासून दि.१३ जूनपर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या असून नवीन शैक्षणिक वर्ष दि.१४ जूनपासून सुरू होणार आहे.
कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते नववी व अकरावीच्या वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले, मात्र कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू होते. कोरोना रुग्णसंख्या खालावल्यानंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग नोव्हेंबर तर पाचवी ते आठवीचे वर्ग जानेवारीपासून सुरू झाले. मात्र पहिली ते चाैथीपर्यंतच्या वर्गाचे अध्यापन ऑनलाइनच सुरू होते. दहावीची बोर्डाची परीक्षा असतानाही कोरोनामुळे घेणे अशक्य असल्याने परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे मात्र जाहीर करण्यात आले आहे.
एप्रिलमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने मुले घरीच आहेत. मात्र वर्षभराच्या एकूण सर्वंकष मूल्यमापनावर निकाल देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे उन्हाळी दीर्घ सुट्टी दि.१ मे पासून दि.१३ मे पर्यंत जाहीर करण्यात आली आहे. मात्र नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा दि.१४ जूनपासून सुरू होणार आहेत.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये उन्हाळी, हिवाळी सुट्टीमध्ये सुसूत्रता राहावी यासाठी शिक्षण संचालनालयातर्फे दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, सैनिक शाळांतून उन्हाळी व हिवाळी दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळसाठी सुट्टी देण्यात येते. राज्यातील शिक्षक संघटनांकडून वारंवार केल्या जात असलेल्या मागणीनंतर शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्यांचे पत्र शाळांना देण्यात आले आहे.
जिल्ह्यात अनुदानित ३३३ व विनाअनुदानित ९६ मिळून ४२८ माध्यमिक शाळा आहेत. तर २५७४ प्राथमिक शाळा व १४८ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. सर्व शाळांचे कामकाज शासनाच्या सूचनेनुसार दि.१४ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र कोरोनाचे संकट टळलेले नसल्यामुळे त्यावेळची परिस्थिती पाहून ऑनलाइन किंवा ऑफलाइन अध्यापन पध्दतीबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.