पूरग्रस्त भागातील शाळा दुरुस्ती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:37 AM2021-09-08T04:37:37+5:302021-09-08T04:37:37+5:30
चिपळूण : चिपळुणातील महापुरात अनेक शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फाऊंडेशनच्या माध्यमातून आगामी काळात शाळा दुरुस्तीची कामे हाती ...
चिपळूण : चिपळुणातील महापुरात अनेक शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फाऊंडेशनच्या माध्यमातून आगामी काळात शाळा दुरुस्तीची कामे हाती घेणार असल्याचे मत साद फाऊंडेशनचे अध्यक्ष वामन कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
चिपळूण शहरासह खेर्डी, कळंबस्ते, कालुस्ते, मजरेकाशी, मिरजोळी परिसरात महापुराने थैमान घातले होते. त्यात हजारो लोकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. पूरग्रस्त कुटुंबांचा संसार सावरण्यासाठी विविध संस्थांनी मदतीचा हात दिला. महापुरानंतर साद फाऊंडेशनने केलेल्या कामाची माहिती देताना अध्यक्ष वामन कांबळे म्हणाले की, चिपळूणसह महाड येथील पूरग्रस्तांना संस्थेने तातडीची मदत दिली. पहिल्या टप्प्यात पूरग्रस्त गावे निश्चित करून तिथे मदत पोहोचविण्यात आली. अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर कुटुंबांना आवश्यक असलेले संसारोपयोगी साहित्य दिले आहे. त्यानंतर आलोरे व पेठमाप येथील गरजू कुटुंबांना भांडी देण्यात आली. गरजू मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यापुढील कालावधीत शैक्षणिक कामे हाती घेतली जाणार आहेत. ज्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आवश्यक आहे, त्यांना ती पुरविण्याचा संस्थेचा मानस आहे. यावेळी साद फाऊंडेशनचे जगदीश पाटणकर, अनिल कांबळे, हेमराज कुरडीया, सुरेश वाडेकर, रमाकांत कांबळे, सुनील कांबळे, दीपक कांबळे उपस्थित होते.