‘कुटुंबकल्याण’च्या शस्त्रक्रियेला ‘कात्री’
By admin | Published: March 24, 2016 10:14 PM2016-03-24T22:14:01+5:302016-03-25T00:05:46+5:30
नादुरुस्त इमारत : लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यथा
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नादुरुस्त झाल्यामुळे तब्बल दोन वर्षे याठिकाणी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. पावसाळ्यापूर्वी या इमारतीची दुरुस्ती न झाल्यास या ठिकाणी रुग्णांवर उपचार करणेही अवघड होणार आहे.
लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचारी वसाहतीची वाताहत हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. मात्र, अद्यापही या इमारतीच्या दुरूस्तीकडे शासनाने लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे. हे प्राथमिक केंद्र महामार्गावर असल्याने अपघात वा शवविच्छेदनासाठी या केंद्राचा प्रामुख्याने आधार घेतला जातो.
याचबरोबर आसपासची अकरा गावे, वस्त्या व अन्य उपकेंद्रे या ठिकाणी जोडली गेली असल्याने इथे रुग्णांची सततची ये-जा असते. दीडशेहून अधिक विंचूदंश तर तितक्याच सर्प व श्वानदंशाच्या रुग्णांनी येथे वर्षभरात उपचार घेतले आहेत.
या केंद्रात चालणारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मागील दोन वर्ष बंद राहावी, ही दखल घेण्याजोगी बाब रुग्णकल्याण समिती वा जिल्हा आरोग्य विभागाच्या नजरेतून सुटावी ही शोकांतिकाच म्हणावी लागेल, असे येथील रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी येथे स्त्री शस्त्रक्रिया झाल्याचे वैद्यकीय अधिकारी अविनाश ढगे यांनी सांगितले. याचाच अर्थ इथे सोय असतानाही रुग्णांना कळंबणी अथवा कामथे येथे जावे लागले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. आजही केवळ उन्हाळा आहे, वातावरण कोरडे आहे, म्हणून येथे शस्त्रक्रिया होऊ शकली.
नजीकच्या काळात या आरोग्य केंद्राची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात शस्त्रक्रिया करणे दूरच रुग्ण तपासणेही अवघड होणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. (वार्ताहर)
ढगे : मे अखेरपर्यंत दुरुस्ती होणार
लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून, कामाची निविदा देखील झाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होऊन मे अखेरपर्यंत याची दुरुस्ती होण्याची आशा आहे.
-डॉ. अविनाश ढगे,
वैद्यकीय अधिकारी
संतप्त प्रतिक्रिया
लोटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे प्रशासनाने यापूर्वी लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहेत.