ऑनलाईन अध्यापन राबविणे अशक्य--- इंटरनेट सेवेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 01:29 PM2020-06-01T13:29:11+5:302020-06-01T13:32:05+5:30
कोरोनाचे हे संकट कधी टळेल व कधी एकदा मुलांच्या शाळा सुरू होतील, असे प्रत्येक पालकाला वाटू लागले आहे. परंतु, कोरोनाच्या धास्तीमुळे शाळा लवकर सुरू झाल्या तरी पालक मात्र मुलांना शाळेत पाठविण्यास धजावणार नाहीत, हेही नक्की!
रत्नागिरी : दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शासन ऑनलाईन अध्यापन पध्दतीचा विचार करीत आहे. परंतु, खेडोपाडी इंटरनेट सेवेचा अभाव असल्याने ऑनलाईन अध्यापन पध्दती रत्नागिरी जिल्ह्यात राबविणे सहजशक्य नाही. त्याऐवजी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाची व्याप्ती कमी करण्याचा पर्यायच योग्य आहे.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. दिनांक १५ मार्चपासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मुलांच्या वार्षिक परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व मुले घरी असून, घरामध्ये अभ्यास, मनोरंजन, खेळ या गोष्टी सुरू आहेत. कोरोनाचे हे संकट कधी टळेल व कधी एकदा मुलांच्या शाळा सुरू होतील, असे प्रत्येक पालकाला वाटू लागले आहे. परंतु, कोरोनाच्या धास्तीमुळे शाळा लवकर सुरू झाल्या तरी पालक मात्र मुलांना शाळेत पाठविण्यास धजावणार नाहीत, हेही नक्की!
शाळा सुरू होतील तेव्हा होतील तोपर्यंत मुलांना अनेक शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन अभ्यास सुरु ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ऑनलाईन अभ्यास करणे अवघड आहे. अनेक पालकांकडे अॅड्रॉईड मोबाईल आहेत. परंतु, ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी जे इंटरनेट लागते ते बºयाच पालकांना नेटवर्क समस्येमुळे सहजासहजी मिळत नाही. गरीब मुलांना ऑनलाईन अभ्यास परवडणारा नाही. खेडोपाडी तर नेटवर्क नसल्याने मुलांचा बाह्य जगताशी संपर्क कमी येतो. तसेच घरात एकच मोबाईल असल्याने पालक कामासाठी बाहेर जाताना मोबाईल घेऊन जात असल्याने मुलांना ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल उपलब्ध होऊ शकत नाही. तसेच ऐन सुट्टीच्या कालावधीमध्ये ऑनलाईन अभ्यासाचा बोजा मुलांच्या मनावर राहिला तर मुले चिडचिडी व तणावग्रस्त होण्याची शक्यता आहे. ज्याला शक्य होईल त्यांनी ऑनलाईन अभ्यास करावा परंतु त्याची सक्ती प्रत्येक मुलावर नसावी.
- दरवर्षी राज्यात एकाच दिवशी १५ जून रोजी शाळा सुरू होतात. यावर्षी कोरोनामुळे शाळा सुरू होण्याबाबतचा निर्णय जुलैमध्ये घेतला जाणार असला, तरी पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षात कमी दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. त्यामुळे अध्यापन करण्यातही अडचण निर्माण होऊ शकते. परिणामी अभ्यासक्रमाची व्याप्ती कमी केली तर कमी अवधीत मुलांना ज्ञानार्जन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे शासनाने याबाबत विचार करणे गरजेचे आहे.
शाळा लवकर सुरू करणे अशक्य असल्याने ऑनलाईन अध्यापन पद्धती किंवा रेडिओ, टीव्हीवरून मार्गदर्शन याचा विचार सुरू आहे. शहरातील शाळांमध्ये हे जरी शक्य असले तरी बहुतांश पालकांचा मोबाईल क्रमांक शाळांतून देण्यात आल्याने दिवसभर पालकाच्या जवळ कामाच्या ठिकाणी मोबाईल असल्याने ते अशक्य आहे. ग्रामीण भागात तर इंटरनेटचा अभाव असल्याने ऑनलाईन अध्यापन पद्धतीबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्याऐवजी अभ्यासक्रमाची व्याप्ती कमी केली तर त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. ग्रामीण भागात मोलमजुरी करणाऱ्या पालकांना मोबाईल व इंटरनेटसाठी खर्च करणे परवडणारे नाही.
- दीपक नागवेकर, जिल्हा सरचिटणीस, प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरी.
वर्गात अध्यापन करताना, लहान मुले एकाग्र होत नाहीत. तर ऑनलाईन अध्यापन पध्दतीत ती कशी होणार आहेत. शाळेत विद्यार्थी शिक्षकांचा डोळा चुकवून खोड्या करीत असतात, तर ऑनलाईन अध्यापन पध्दतीत काही मिनिटानंतर गेम खेळण्याकडे वळतील. शिवाय ही पध्दत शहरापुरती सीमित असली तरी खेडोपाडी शक्य नाही. शिवाय सर्वसामान्य कुटुंबियांनादेखील मोबाईल, इंटरनेटचा खर्च परवडणारा नाही.
- प्रभा देसाई, पालक
रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता, खेडोपाडी, वाडीवस्त्यांवर लोकवस्ती आहे. त्यामुळे कित्येक गावातून मोबाईलला रेंजच नाही. त्यामुळे अशा गावात ऑनलाईन अध्यापन अशक्य आहे. शिवाय मोमलमजुरी करणाºया पालकांकडे अॅड्राईड मोबाईल नसून, साधे मोबाईल आहेत. त्यामुळे या अध्यापन पद्धतीबाबत विचार करणे गरजेचे आहे.
- डॉ. अस्मिता मजगावकर, केंद्रप्रमुख, झरेवाडी केंद्र
कोरोनामुळे यावर्षी शाळा सुरू होण्यास विलंब होणार आहे. साहजिकच शाळा सुरु झाल्यानंतर अध्यापनासाठी कमी कालावधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौध्दीक क्षमतेचा विचार करून कमी कालावधीत पूर्ण अभ्यासक्रम घेण्याऐवजी जर अभ्यासक्रमाची व्याप्ती कमी केली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. यामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होण्यासही मदत होईल.
- विजय पाटील, पालक