शालेय वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड
By Admin | Published: June 13, 2016 09:54 PM2016-06-13T21:54:27+5:302016-06-14T00:23:26+5:30
दोन दिवस शिल्लक : सहावीच्या पुस्तकांची प्रतीक्षा
रत्नागिरी : शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे शालोपयोगी साहित्याची खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी होत आहे. यावर्षी इयत्ता सहावीचा अभ्यासक्रम बदलला असून, अद्याप पुस्तके उपलब्ध नाहीत. परंतु, पहिली ते पाचवी व सातवी ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागल्यानंतर बहुतांश पालक शैक्षणिक साहित्य खरेदीला सुरुवात करतात. काही पालक शाळा सुरू होण्यापूर्वी खरेदी करतात. सुटीसाठी परगावी गेलेले पालक घरी परतले असून, पुस्तके व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी दुकानातून गर्दी होत आहे.
पावसात छत्र्या, पिशव्या सांभाळत पुस्तके, वह्या खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येते. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके दुकानातून खरेदी करावी लागत आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वह्यांच्या किमतीत २० टक्के वाढ झाली आहे. नामवंत कंपन्यांच्या वह्यांना विशेष मागणी होत आहे. नवनीत, स्मार्ट, क्लासमेट कंपन्यांच्या वह्यांचा खप अधिक आहे. बहुतांश वह्यांचे पृष्ठ कव्हर ब्राऊन कलरचे आहेत. फुले अथवा प्राण्यांची चित्र असलेल्या वह्यांना मागणी होत आहे.
कंपासबॉक्स, पाण्याची बाटली, टीफीन आदी प्लास्टिक साहित्य, शालेय बॅग, स्केचपेन, रंगपेट्या, कव्हर्स, स्टीकर्स यांच्या किमतीतही पाच टक्के वाढ झाली आहे. स्कूल बॅग्ज, स्टीकर्समध्ये बेनटेन, बार्बी डॉल, अॅग्रीबर्डबरोबरच शायनिंग स्टीकर्सला विशेष मागणी आहे. प्लास्टिक कोटेट कव्हर टिकाऊ असल्याने कव्हर्सची खरेदी जोरात सुरू आहे. (प्रतिनिधी)
दुकाने सुरूच...
रविवारी रत्नागिरी शहरातील बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात येतात. मात्र, शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने व्यावसायिकांनी रविवारी दुकाने सुरू ठेवली होती. त्यामुळे पालकांनी रविवारीदेखील खर्दीसाठी गर्दी केली होती.