एस.डी. कार्डचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:43+5:302021-06-09T04:38:43+5:30
डाक अदालत रत्नागिरी : मुख्य पोस्ट मास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी दि. २५ जून रोजी सकाळी ११ वाजता ...
डाक अदालत
रत्नागिरी : मुख्य पोस्ट मास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी दि. २५ जून रोजी सकाळी ११ वाजता मुख्य पोस्ट मास्तर जनरल मुंबई यांच्या कार्यालयात ११५ वी डाकअदालत आयोजित केली आहे. ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, त्यांची दखल घेतली जाणार आहे.
शिवराज्याभिषेक दिन
दापोली : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत साकुर्डे येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीसमोर गुढी उभारून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका संघटक उन्मेश राजे, सरपंच सचिन बैकर उपस्थित होते.
जीवनावश्यक वस्तू वाटप
चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथील सुनील साळुंखे परिवाराच्या पुढाकाराने मुंबईतील दीपजनसेवा समितीच्या माध्यमातून काडवली बौद्धवाडी व रोहिदासवाडी येथील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संतोष सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
चौकशीची मागणी
चिपळूण : तालुक्यातील कळकवणे येथील शेतकऱ्याला सर्पदंश झाला असता दादर प्राथमिक आरोग्य केंद्र व कामथे रुग्णालयात उपचार झाले नसल्याने रुग्णाची हेळसांड झाली. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करावे लागले. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अशोक कदम यांनी केली आहे.
पेरणीच्या कामाला वेग
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली असून, वेगाने कामे सुरू आहेत. दिवसा पावसाची उघडीप असल्याने कामे वेळेवर पूर्ण होत आहेत. पारंपरिक नांगरणीसह पॉवर ट्रिलरचा वापर करण्यात येत आहे. लॉकडाऊन असतानाही उपलब्ध साधनांचा वापर करून पेरणीची कामे उरकण्यात येत आहेत.
रोपांना मागणी
रत्नागिरी : मृगनक्षत्रात फळबाग लागवड करण्यात येत असल्याने विविध प्रकारच्या रोपांना मागणी होत आहे. आंबा, काजू, फणस, नारळ, कोकम, सुपारी, मसाल्यांची रोपे, आदींना विशेष मागणी होत आहे. कोरोनामुळे औषधी वनस्पतीच्या लागवडीकडे कल वाढला आहे.