मतलई वाऱ्यामुळे सागरी मासेमारी झाली ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:59 PM2020-01-19T23:59:36+5:302020-01-19T23:59:49+5:30
रत्नागिरी : हवामानातील सातत्यपूर्ण चढ - उतारांमुळे १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या सागरी मासेमारी हंगामाला अद्याप सूर सापडलेला नाही. आता ...
रत्नागिरी : हवामानातील सातत्यपूर्ण चढ - उतारांमुळे १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या सागरी मासेमारी हंगामाला अद्याप सूर सापडलेला नाही. आता पुन्हा एकदा जोरदार मतलई वाºयामुळे सागरी मासेमारी सलग तिसºया दिवशी ठप्प झाली. आता तरी वातावरणात बदल होईल का व पुन्हा मासेमारी सुरू होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. मासेमारीच ठप्प झाल्याने बाजारपेठेतही मासळीची आयात रोडावली आहे. लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
१ आॅगस्ट २०१९ पासून राज्याच्या सागरी हद्दीत पारंपरिक मासेमारी सुरू झाली. त्यानंतर १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. मात्र, अनेक संकटांच्या गर्तेमध्ये मच्छिमारी व्यवसाय पुरता भरडला गेला आहे. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांच्या काळातील पर्ससीन मासेमारीही यंदा फारशी चालली नाही. निसर्गाच्या अवकृपेमुळे सातत्याने मासेमारी ठप्प झाली. त्यामुळे यावर्षी मत्स्योत्पादनातही घट होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मत्स्यदुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली जात आहे.
पर्ससीन मासेमारीला अवघे चार महिनेच मुदत असल्याने ती पुरेशी नाही, यंदा हंगाम चाललाच नाही, अशी तक्रार पर्ससीन मच्छीमारांमधून केली जात आहे. त्यामुळे चार महिन्यांची मुदत आणखी दोन महिने वाढवून मिळावी, अशी पर्ससीन मच्छीमारांची मागणी आहे. त्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडेही पर्ससीन मच्छिमारांच्या संघटनेकडून पाठपुरावा केला जात आहे. तर पर्ससीन मासेमारी संपल्यानंतरही एलईडी मासेमारी करून मासळी किनाºयावरच येऊ दिली जात नसल्याचा आरोप पारंपरिक मच्छिमारांमधून केला जात आहे.
पर्ससीन व पारंपरिक मच्छिमारांमधील संघर्ष कायम आहे. त्यातच या दोन्ही प्रकारांमधील मासेमारीला सुरू असलेल्या हंगामात नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांपासून मतलई वारे वाहू लागल्याने मासळी खोल समुद्रात पसार झाली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांना जवळच्या अंतरावर मासळी मिळणेच दुरापास्त झाले आहे. हवामानात योग्य बदलानंतरच पुन्हा मासेमारी सुरू होण्याची शक्यता आहे.
एलईडीला विरोध : २६ला धरणे आंदोलन
२६ जानेवारीला रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एलईडी मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छिमारांचे धरणे आंदोलन.
पारंपरिक व पर्ससीन मच्छिमारांना यंदाचा हंगाम गेला तोट्यात.
१ आॅगस्ट २०२० पासून मासेमारी हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे मासेमारीला दणका.
मतलई वाºयामुळे मासेमारीवर परिणाम झाला, हे बरोबर आहे. परंतु पर्ससीन मासेमारी बंद होऊन अद्याप एलईडी मासेमारी सुरूच असल्याने म्हाकुल व अन्य मासळी बाहेरच्या सागरी क्षेत्रात पकडली जाते. किनाºयावर मासळी येत नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे मत मच्छिमार नेते आप्पा वांदरकर यांनी व्यक्त केले.
सध्या मतलई वाऱ्यांमुळे सागरी मासेमारी ठप्प झाली आहे. गुरुवारी मासेमारीसाठी गेलेल्या सर्व नौका किनाºयावर परतल्या आहेत. मतलई वाºयांमुळे नौका समुद्रात नेणेही धोकादायक बनले आहे, अशी माहिती मच्छीमार नेते नदीम सोलकर यांनी ‘लोकमत’ला दिली. एलईडी मासेमारी होत असल्याचे सांगितले सांगितले जात आहे, याबाबत विचारता सोलकर म्हणाले, एलईडी मासेमारी किती प्रमाणात सुरू आहे हे सांगता येणार नाही. परंतु अशा नौका ६५ ते १०० किलोमीटर सागरी क्षेत्रात जातात. त्यांना एका फेरीसाठी २४०० लिटर डिझेल लागते. एवढा खर्च करून मासेही मिळत नाहीत.