अंगणवाडीसाठी निकृष्ट धान्य ठेवणाऱ्या गोडावूनला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:39 PM2020-12-10T13:39:14+5:302020-12-10T13:40:46+5:30
Food and Drug administration, ratnagirinews अंगणवाडीतील मुले आणि गरोदर महिलांना देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रकार माजी खासदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. त्यानंतर बुधवारी रात्री उशिराने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत या गोदामाला सील ठोकले आहे.
रत्नागिरी : अंगणवाडीतील मुले आणि गरोदर महिलांना देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रकार माजी खासदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. त्यानंतर बुधवारी रात्री उशिराने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत या गोदामाला सील ठोकले आहे.
धान्यात खडे व कचरा आढळला असून, टोके पडलेले हरभरे व मसुरडाळ पॅकबंद करण्यात येत असल्याचा प्रकार युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. या धान्याबरोबर देण्यात येणारी हळद व मसाल्याची पॅकेटस् ठेकेदाराकडून उपलब्ध करुन देण्यात आली नाहीत. रत्नागिरी औद्योगिक वसाहतीत पॅकिंग होत असताना, वर पत्ता मात्र चिपळूण व मुंबईतील असल्याचे या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांसमोर उघड केले.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या नावाखाली मिरजोळे एमआयडीसीमधील गोडावूनमध्ये अंगणवाडीतील बालके व गरोदर महिलांना देण्यात येणारे धान्य पॅकिंग होत आहे. अनेक पाकिटांवर तारीख, पॅकिंग नंबर टाकला जात नसल्याची माहिती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन व उपाध्यक्ष नंदू चव्हाण यांना मिळाली.
त्यांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पदाधिकाऱ्यांसह राजू कीर, नित्यानंद दळवी, हर्षद घोसाळकर, विकी जैन, संकेत बापट, संजय आयरे यांनी गोडावूनला भेट दिली असता गव्हाची फुटलेली पोती, त्यामध्ये दगडांसह कचरा मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात आले.
हरभरा व मसूरडाळीतही टोके व कचरा आढळला. रत्नागिरी ग्रामीण पोलीस तातडीने तेथे दाखल झाले. मात्र ठेकेदार उशिरापर्यंत आले नाहीत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत घटनास्थळी अधिकारी दाखल झाले नव्हते. सव्वासहा वाजल्यानंतर महिला व बालविकास अधिकारी आर. व्ही. काटकर यांनी गोदामाला भेट देऊन पाहणी केली.