विनाेद बैकरकडील बंदुकीच्या मालकाचा शाेध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:33 AM2021-04-02T04:33:16+5:302021-04-02T04:33:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : तालुक्यातील साकुर्डे गनेशनगर (जंगमवाडी) येथील विनोद मनोहर बैकर (३३) या तरुणाचा बंदुकीची गाेळी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : तालुक्यातील साकुर्डे गनेशनगर (जंगमवाडी) येथील विनोद मनोहर बैकर (३३) या तरुणाचा बंदुकीची गाेळी लागून ३१ मार्च राेजी सकाळी दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. दरम्यान, त्याने वापरलेली बंदूक काेणाच्या मालकीची आहे, याचा शाेध पाेलीस घेत आहेत.
विनाेद बैकर बुधवारी सकाळी गावाजवळ असणाऱ्या रहाटीमध्ये शिकारीसाठी गेला होता. जाताना त्याने जवळच्या वाडीतील तरुणाला शिकारीसाठी येतोय का असे हटकले होते, मात्र, घरी काम असल्याचे सांगून त्याने जाणे टाळले. त्यामुळे विनाेद एकटाच गेला हाेता. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रहाटीमधून बंदुकीचा आवाज आला. विनोदने शिकार केली म्हणून काम करत असलेला तरुण रहाटीकडे धावत गेला. पण रहाटीमध्ये विनोद कुठेच दिसला नाही. त्याने विनाेदला हाकाही मारल्या, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
त्याने शोधाशोध केली असता, विनोद एका दगडाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याने पाहिला. विनोदच्या बेंबीच्या खालील भागास बंदुकीची गोळी लागल्याचे त्याने पाहिले. त्याने पाेलीस पाटील यांना माहिती दिल्यानंतर पाेलिसांना कळविण्यात आले. पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
विनोद हा विवाहित असून, त्याला २ मुलगे आहेत. दरम्यान, विनोद एकटाच शिकारीसाठी कसा गेला, त्याच्या ताब्यात असणारी सिंगल बोअरची बंदूक काेणाच्या मालकीची आहे याचा तपास दापोली पोलीस करत आहेत.