गुहागरात कोविड रुग्णालयासाठीच्या जागेचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:30 AM2021-04-17T04:30:38+5:302021-04-17T04:30:38+5:30

असगोली : गुहागर तालुक्यात खासगी कोविड रुग्णालय होण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे. त्यासाठी शृंगारतळीतील रेनबो लॉजसह अली पब्लिक ...

Search for a site for Kovid Hospital in Guhagar continues | गुहागरात कोविड रुग्णालयासाठीच्या जागेचा शोध सुरू

गुहागरात कोविड रुग्णालयासाठीच्या जागेचा शोध सुरू

Next

असगोली : गुहागर तालुक्यात खासगी कोविड रुग्णालय होण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे. त्यासाठी शृंगारतळीतील रेनबो लॉजसह अली पब्लिक स्कूल व पालपेणे रस्त्यावरील एक नवी इमारत असे तीन पर्याय शासनासमोर आहेत. यातील एक जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रही तालुका प्रशासनाला प्राप्त झाले आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे यापैकी एकाही जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

या जागेबाबत राज्य प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन अशा टप्प्याने बैठकीचे सत्र पार पडले. या बैठकींनंतर गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला. त्याची अंमलबजावणी ग्रामीण रुग्णालयाने सुरु केली. या आदेशाबरोबरच जिल्हा प्रशासनाने गुहागर तालुक्यात ‘प्रायव्हेट पेड कोविड हॉस्पिटल’ सुरु करण्याचे आदेशही दिले.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गुहागरमधील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या १३ डॉक्टरांनी एकत्र येत रेनबो लॉज, शृंगारतळी येथे ‘पेड कोविड हॉस्पिटल’ तयार केले होते. मात्र, या ठिकाणी केवळ दोन रुग्णांवरच उपचार झाले.

‘पेड कोविड हॉस्पिटल’ला जागा निश्चित करण्यासाठी गुरुवारी (१५ एप्रिल) गुहागरच्या तहसीलदार लता धोत्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चरके, जी १३ ग्रुपमधील दोन डॉक्टर व अन्य प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या टीमने तीन जागा पाहिल्या. यापैकी एक जागा ताब्यात घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रही तालुका प्रशासनाकडे होते. मात्र, सदर जागेचे सुमारे १ लाखाचे महावितरणचे देयक भरलेले नव्हते. त्यामुळे महावितरणने या इमारतीची वीज तोडली आहे. शिवाय कोविडमुळे ही इमारत वर्षभर बंद आहे. हा तोटा सहन न झाल्याने मालक चिंतेत आहे. अशा परिस्थितीत जागा मालकाशी संपर्क झाल्याशिवाय जागा ताब्यात घेणे याेग्य नसल्याने या जागेचा विषय टीमने मागे ठेवला. पालपेणे रोडवर एक नवी इमारत बांधून पूर्ण आहे. तेथे बोलणी सुरु झाली. ही बोलणी अंतिम टप्प्यात असताना स्थानिकांनी वस्तीत कोविड हॉस्पिटल नको, अशी विनंती केली. शृंगारतळीतील आणखी एका जागेसंदर्भात प्रशासन बोलणी करत आहे. मात्र, १५ एप्रिलला सायंकाळपर्यंत कोणत्याच जागेसंदर्भात ठोस निर्णय झालेला नाही.

चाैकट

प्रशासनाने जागा द्यावी, डाॅक्टर सर्वताेपरी मदत करतील

कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने गुहागरात गतवर्षी सुरू करण्यात आलेले रुग्णालय बंद पडले. त्यामुळे सुमारे ५ लाखांचा तोटा सहन करावा लागला. जी १३ ग्रुपमधील प्रत्येक डॉक्टराने हा तोटा आपल्या खिशाला चाट देऊन भरुन काढला. या पार्श्वभूमीमुळे गुहागर तालुक्यातील डॉक्टरांनी तालुका प्रशासनाला आम्ही सर्वतोपरी मदत करु, मात्र, जागा घेण्याचे आर्थिक गणित आम्ही जुळवू शकत नाही, अशी भूमिका मांडली. त्यामुळे गुहागर तालुक्यात रुग्णालय नसल्याने तालुका प्रशासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी व वैद्यकीय व्यावसायिकांच्या मदतीने हे रुग्णालय सुरु करण्याचे ठरले.

Web Title: Search for a site for Kovid Hospital in Guhagar continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.