पहिल्या फळीतील ३७० कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन दुसऱ्या डोसचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:37+5:302021-05-20T04:34:37+5:30
रत्नागिरी: आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचारी यांच्यासाठी बुधवारी दुसऱ्या डोससाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. शहरातील मिस्त्री हायस्कूल येथे ...
रत्नागिरी: आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचारी यांच्यासाठी बुधवारी दुसऱ्या डोससाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. शहरातील मिस्त्री हायस्कूल येथे २९० आणि कोकणनगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील ८० अशा एकूण ३७० कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसचा दुसरा डोस देण्यात आला. आरोग्य यंत्रणेकडून पूर्वनियोजन करण्यात आल्याने लसीकरणात कुठलीही अडचण न येता ही मोहीम पार पडली.
लसचा पुरवठा सध्या कमी पडू लागल्याने शासनाने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस देणे थांबविले आहे. सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी तसेच पहिल्या फळीतील महसूल, पोलीस कर्मचारी यांनाही लसीकरण करण्यात येत आहे. प्रामुख्याने ज्यांचा कोविशिल्ड तसेच कोवॅक्सिन लसचा दुसरा डोस राहिला आहे, अशांना लस उपलब्ध होताच ती देण्यात येत आहे.
आरोग्य कर्मचारी तसेच पहिल्या फळीतील कर्मचारी यांना कोवॅक्सिन लसचा दुसरा डोस देण्यासाठी आरोग्य प्रशासनातर्फे बुधवारी शहरातील मिस्त्री हायस्कूल आणि कोकण नगर येथे लसीकरण मोहीम आयोजित केली होती. यासाठी आरोग्य यंत्रणेने पूर्वनियोजन केले होते. दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेलेल्यांपैकी प्राधान्यक्रमाने यादी तयार करून त्यापैकी मंगळवारी १९० जणांना फोन करून मिस्त्री हायस्कूल येथे लसीकरण केंद्रावर बोलावण्यात आले. त्याव्यतिरिक्त अन्य १०० जणांना कूपन्स दिली व त्यांचेही लसीकरण केले. तसेच कोकणनगर येथेही ८० जणांना दुसरा डोस देण्यात आला. या योग्य नियोजनामुळे या लसीकरण केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ न हाेता, सर्वांनाच लस मिळाली. या मोहिमेत आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस यंत्रणेचेही उत्तम सहकार्य मिळाले.
हेल्पिंग हॅण्डसचे सहकार्य...
लसीकरण मोहिमेदरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे लसीकरणासाठीच्या नोंदणी प्रक्रियेत पुरवठा सुरळीत हाेईपर्यंत अडथळा निर्माण झाला. मात्र, हेल्पिंग हॅण्डसचे सदस्य जयंतीलाल जैन यांनी स्वत:चा लॅपटाॅप आरोग्य यंत्रणेला दिला. त्यामुळे लसीकरण प्रक्रियेतील ऑनलाईन नोंदणीत अडथळा आला नाही.