चिपळुणात कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:31 AM2021-04-07T04:31:55+5:302021-04-07T04:31:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यात एकीकडे लसीकरणाला वेग देण्यात आला असताना कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. ...

The second wave of corona in Chiplun is more intense | चिपळुणात कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र

चिपळुणात कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यात एकीकडे लसीकरणाला वेग देण्यात आला असताना कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत तालुक्यातील ११ हजार ४७० जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. सद्यस्थितीत २२१ रुग्ण कोरोना बाधित आहेत. यामध्ये शहरी भागात ५५, तर एकट्या सावर्डे विभागात ४९ रुग्ण आहेत.

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वर्षभरात तालुक्यात ११२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत चिपळूण पूर्णतः स्थिरस्थावर होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून पेढांबे येथील कोविड सेंटर बंद असून तूर्तास कामथे उपजिल्हा रुग्णालयातच संबंधित रुग्णांना उपचार दिले जात आहेत. बहुतांशी रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने पूर्णतः लसीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे.

आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ७४० जणांना लसीकरणाचा पहिला, तर १३६७ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यासाठी नगर परिषद आरोग्य विभागाच्या मदतीने शहरातील पवन तलाव येथे नागरी आरोग्य केंद्र चालविले जात असून येथे दररोज १५० जणांना डोस दिले जात आहेत. तसेच कामथे उपजिल्हा रुग्णालयासह रामपूर, कापरे, खरवते, दादर, शिरगाव, अडरे, सावर्डे, फुरुस, वहाळ या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस पुरविले जात आहेत. त्याशिवाय दळवटणे, मांडकी, टेरव, खेरशेत, बामणोली, चिवेली, उभळे, कुटरे, भिले, ओमळी, निर्व्हाळ, कळवंडे, पेढांबे, निवळी, कुंभार्ली, कोळकेवाडी, डेरवण, पिंपळी खुर्द व कळकवणे आदी १८ उपकेंद्रांवर मागणीनुसार लसीचा पुरवठा केला जात आहे. तूर्तास प्रत्येक केंद्रावर आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका व डाटा एन्ट्रीसाठी शिक्षक कार्यरत आहेत.

डोसच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी

तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर कोरोना लस पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आधीच दऱ्या-खोऱ्यात गाव असल्याने लसीच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी लागत आहे. त्यासाठी २ ते ८ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असल्याने आयएलआरमधून त्या-त्या गावी पोहोच केले जात आहे. एखाद्या ठिकाणी ग्रामस्थांची मदत घेऊन उपाययोजना केली जात आहे.

रिक्त पदांमुळे वाढता बोजा

तालुक्यातील आरोग्य विभागात आजही अनेक पदे रिक्त आहेत. कोरोनासारख्या परिस्थितीत हजारो हातही मदतीला धावून आले तरी कमी पडतील. असे असताना रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरच अतिरिक्त भार पडत आहे. तालुक्यात ५७६ कर्मचारी संख्या आवश्यक असताना त्यापैकी ४७८ पदे भरली आहेत. अजूनही ८६ पदे रिक्त असून त्यामध्ये ३३ आरोग्य सेवक, २२ महिला आरोग्य सेवक, पुरुष व महिला परिचारिका प्रत्येकी ९ आणि २ औषध निर्माण अधिकाऱ्यांसह अन्य काही पदे रिक्त आहेत.

ज्येष्ठ नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद

तालुक्यात कोरोना योद्धा व शासकीय प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांसाठी सर्वप्रथम कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. मात्र, शासकीय रुग्णालयात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा अतिशय अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील केवळ १९६ ज्येष्ठ नागरिकांनी डोस घेतले.

खासगी रुग्णालयांनाही कमी प्रतिसाद

चिपळूण तालुक्यातील चार खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता मिळाली आहे. यामध्ये शहरातील अपरांत हॉस्पिटल, लाईफ केअर हॉस्पिटल, डेरवण हॉस्पिटल व एसएमएस हॉस्पिटलचा समावेश आहे. या चारही रुग्णालयात आतापर्यंत १९९३ जणांनी लस घेतली आहे. शासकीय रुग्णालयाच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.

नागरी आरोग्य केंद्राचे लवकरच स्थलांतर

एका बाजूला कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला कोरोना प्रतिबंध लसीकरणाची मागणी वाढत आहे. शहरी भागासाठी दररोज २०० लसींचे डोस उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यानुसार येथील आरोग्य यंत्रणेने तयारी केली असून, त्यासाठी एल टाईप शॉपिंग सेंटर येथे लसीकरण केंद्र स्थलांतरित करण्यात येणार आहे.

...................

कोरोना प्रतिबंध लसीकरणाची मागणी वाढत असली तरी तूर्तास पुरेशी लस उपलब्ध आहे. मागणीनुसार जिल्हा प्रशासनाकडून लस पुरविली जात आहे. शिवाय ज्या भागात मागणी कमी आहे त्या भागातील लस मागणीनुसार अन्य भागात वळवली जात आहे. त्यामुळे अजूनपर्यंत लसीकरणात कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही.

- डॉ. ज्योती यादव, तालुका आरोग्य अधिकारी, चिपळूण.

फोटो- चिपळूण नागरी आरोग्य केंद्र शहरातील एल टाईप शॉपिंग सेंटर येथे लवकरच स्थलांतरित करण्यात येणार आहे.

Web Title: The second wave of corona in Chiplun is more intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.