कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नैराश्येच्या गर्तेत ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:22 AM2021-06-22T04:22:11+5:302021-06-22T04:22:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने सर्वच वयोगटात चिंतेचे आणि नैराश्येचे वातावरण निर्माण केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने सर्वच वयोगटात चिंतेचे आणि नैराश्येचे वातावरण निर्माण केले आहे. रुग्णांबरोबरच इतरांमध्येही डिप्रेशन निर्माण केले आहे. त्यामुळे आता कोरोनावर उपचार करण्याबरोबरच डिप्रेशनसाठीही उपचार करण्याची गरज भासू लागल्याने आता या औषधांची विक्रीही वाढली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोकांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ही परिस्थिती बऱ्यापैकी रुळावर येत असतानाच, कोरोनाची दुसरी लाट धडकली. पहिल्या लाटेत शहरांमध्येच बाधित होणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र, दुसऱ्या लाटेत तर गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरला. मृत्यूचे जणू काही तांडवच सुरू झाले. त्यामुळे कोरोना झालेल्यांना आपण यातून बरे होऊना, ही पराकोटीची भीती वाटू लागली आहे. अनेक मृत्यू या भीतीतूनच झाले आहेत. जे आतापर्यंत कोरोनापासून सुरक्षित राहिले आहेत, त्यांना आपण बाधित झालो तर? ही भीती सतावत आहे. अनेकांनी आपल्या आप्तांचा मृत्यू पाहिल्याने त्यांना कमालीचे नैराश्य आले आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेचा धोका सतावतो आहे. सध्या सर्वच वयोगटात नैराश्य निर्माण झाल्याने यातून सावरण्यासाठी औषधेही जास्त प्रमाणात घेत आहेत.
डिप्रेशन का वाढले?
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी लोकांना कोरोना महिन्या - दोन महिन्यांनी जाणार आहे, हे माहीत होते. त्यामुळे सर्व नियमांचे पालन केल्याने त्याचा संसर्ग तितकासा वाढला नाही.
पहिल्या लाटेत विस्कळीत झालेली आर्थिक घडी सुरळीत होत असतानाच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय पुन्हा ठप्प झाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर झाला. अगदी जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे नैराश्य पराकोटीचे पसरले आहे. जगण्यावरील विश्वास उडाला आहे.
आता तिसरी लाट येणार असून तिचा बालकांना धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे डिप्रेशन अधिकच वाढले.
औषध विक्री दुपटीने वाढली...
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर तो प्रचंड भीतीखाली राहतोच. पण आपण पॉझिटिव्ह आलो तर काय होईल, ही भीती आज प्रत्येकाच्या मनात सावलीसारखी वावरत आहे. यातूनच अनेक अगदी मृत्यूच्या दारात जात आहेत. कोरोनाच्या भीतीतून मोठ्या प्रमाणावर डिप्रेशन येत आहे. त्यामुळेच त्यांना या मानसिक स्थितीतून सावरण्यासाठी कोरोनाबरोबरच इतर औषधांची गरज भासत असल्याचे रत्नागिरीतील औषध विक्रेत्याने सांगितले.
सद्यस्थितीत प्रत्येकानेच धीराने घ्यायला हवं. कुठलीही टोकाची भूमिका न घेता, ही परिस्थितीही बदलेल, अशी आशा बाळगायला हवी. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी खबरदारी घेतानाच योग्य आहार, व्यायाम आणि मन शांत राहण्यासाठी योगा किंवा प्राणायाम करायला हवा.
- डॉ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी
अनेकांचे आप्त गेलेत. कुणाचे जॉब गेलेत. त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वच वयोगटात चिंतेचे आणि नैराश्येचे वातावरण मोठ्या प्रमाणावर आहे. सध्याची परिस्थिती पाहता, कुटुंबात एकत्र राहून एकमेकांना आधार देणे, सावरणे गरजेचे आहे. हेही दिवस जातील, ही सकारात्मकताच यातून तारेल.
- डॉ. श्रुतिका कोतकुंडे, मानसोपचार तज्ज्ञ, चिपळूण
हे टाळण्यासाठी काय कराल?
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जसा संयम दाखविला, तशा संयमाची आताही गरज आहे. ही परिस्थितीही बदलणार आहे, मात्र, त्यासाठी थोडा कालावधी जाणार आहे, ही वस्तुस्थिती आपण सर्वांनीच स्वीकारायला हवी.
सध्या कोरोना मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. या महामारीत अगदी जवळच्या आप्तांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे नैराश्य आले आहे. परंतु खचून न जाता धीराने सामना करायला हवा. कोरोनाची खबरदारी घेऊन मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायलाच हवे.
आपण योग्यप्रकारे कोरोनाच्या नियमांचे पालन करतोय, तर आपण नक्कीच सुरक्षित राहू, असा सकारात्मक विचार करायला हवा. मन संतुलित राहावे यासाठी मेडिटेशन आणि व्यायाम करायला हवा.
सद्यपरिस्थितीत आपण आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे आहे. त्यासाठी परिपूर्ण आहार घेणे गरजेचे असून बाहेरचा आहार टाळायला हवा. फळे, कडधान्ये याचा समावेश आहारात हवा करायला हवा.