काेराेना लसीपासून माध्यमिक शिक्षक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:30 AM2021-03-28T04:30:14+5:302021-03-28T04:30:14+5:30
वाटुळ : सध्या जिल्ह्यात कोरोना लसीचे लसीकरण सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सुरू असून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या सूचनेनुसार प्राथमिक ...
वाटुळ : सध्या जिल्ह्यात कोरोना लसीचे लसीकरण सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सुरू असून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या सूचनेनुसार प्राथमिक शिक्षकांनाही लसीकरण सुरू झाले आहे. कोरोनाकाळात पोलीस, डॉक्टर यांच्याबरोबरीने प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम केले होते. असे असतानाही फक्त पत्रात प्राथमिक शिक्षकांच्याच लसीकरणाचा उल्लेख असल्याने माध्यमिक शिक्षकांना प्राथमिक आरोग्य केंद्रावरून परत पाठविले जात आहे. प्रशासनाच्या या दुजाभावामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
जिल्हाधिकारी यांचा दिनांक २१ मार्च रोजीच्या ऑनलाइन बैठकीचा संदर्भ देत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना फक्त प्राथमिक शिक्षकांना लसीकरणाचे आदेश काढले आहेत. वास्तविक, नोव्हेंबरपासून दहावी, बारावी व फेब्रुवारीपासून पाचवी ते नववी प्रत्यक्ष अध्यापन सुरू आहे. माध्यमिक शिक्षक नियमित शेकडो विद्यार्थ्यांमध्ये जाऊन अध्यापनाचे काम करीत आहे. माध्यमिक शाळांतील विद्यार्थी आजूबाजूच्या गावांमधून एसटी प्रवास करीत शाळेत येत असतात. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका जास्त असतानाही माध्यमिक शाळांतील शिक्षकांना तसेच ज्यांनी कोविडयोद्धा म्हणून काम केले, अशा कर्मचाऱ्यांनाही अद्याप लसीपासून वंचित ठेवले जात असल्याचे शिक्षण क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी सांगितले. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक असा दुजाभाव न करता सर्वांनाच लसीकरणाचा लाभ मिळावा, अशी मागणी आनंद त्रिपाठी यांनी केली आहे.