रत्नागिरी विभागातील ९२ गाड्यांचे सुरक्षा कवच पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:33+5:302021-09-09T04:38:33+5:30
रत्नागिरी : एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४६९ गाड्यांना ‘अँटीमायक्रोबियल केमिकल कोटिंग’ ...
रत्नागिरी : एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४६९ गाड्यांना ‘अँटीमायक्रोबियल केमिकल कोटिंग’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी ९२ गाड्यांचे कोटिंग पूर्ण करण्यात आले असून रत्नागिरी व राजापूर आगारात प्राधान्याने कामाची पूर्तता करण्यात आली आहे.
कोरोनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक फेरीनंतर गाडीचे निर्जंतुकीकरण सुरू आहे. प्रवासी गाडीत शिरल्यावर त्याचा ठिकठिकाणी स्पर्श होत असतो. एसटीतील सर्व सीट, हँडरेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, रेलिंग, चालक केबीन, फ्लोरिंग, रबर ग्लेझिंग्ज, प्रवासी येण्या-जाण्याचा मार्ग, सामान कक्षाची बाहेरील व आतील बाजू याठिकाणी अँटीमायक्रोबियल केमिकल कोटींग केले जाणार आहे.
कोरोना व अन्य साथरोग पसरविणाऱ्या विषाणूंचा धोका टाळण्यासाठी ‘अँटीमायक्रोबियल केमिकल’ फायदेशीर ठरणार आहे. कोटिंग वैज्ञानिकरित्या कोरोना व अन्य रोगाचे विषाणू, बुरशी व इतर रोगापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त असल्याने याचा वापर विभागातील निम्म्या गाड्यांना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
‘अँटीमायक्रोबियल केमिकल कोटिंग’साठी महामंडळाने एका कंपनीची नियुक्ती केली असून, आगारनिहाय गाड्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी कंपनीचे पथक दाखल झाले असून, गाड्यांना केमिकल कोटींग करून देण्याचे काम सुरू झाले आहे. रत्नागिरी आगारातील ७६ आणि राजापूर आगारातील २२ मिळून एकूण ९२ गाड्यांचे कोटींग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच हे पथक लांजा आगारातील गाड्यांचे कोटींगच्या कामाला प्रारंभ करणार आहे. गणेशोत्सवामुळे सर्वसामान्यांची लालपरी म्हणून ओळखली जाणारी एस. टी. पूर्ण क्षमतेने धावत आहे. एस. टी.च्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने अँटीमाक्रोबियल जंतुनाशक केमिकलचे कोटिंगचे काम सुरू झाले आहे.
...............................
कोटिंगचे उद्दिष्ट व कोटिंग झालेल्या गाड्या
आगार उद्दिष्ट कामाची पूर्तता
मंडणगड ३४ ००
दापोली ६३ ००
खेड ६५ ००
चिपळूण ७६ ००
गुहागर ४१ ००
चिपळूण ७६ ००
देवरूख ५१ ००
रत्नागिरी ८० ७६
लांजा ३३ ००
राजापूर २६ २२
एकूण ४६९ ९२