बियाण्यावरील अनुदान केले रद्द
By admin | Published: June 16, 2015 11:23 PM2015-06-16T23:23:46+5:302015-06-17T00:39:28+5:30
गेले ते ‘अच्छे दिन’ : शेतकऱ्यांनी पेरले जुनेच बियाणे
शिवाजी गोरे - दापोली
कोकणातील शेतकऱ्याला भात बियाणे खरेदीत ७५ टक्के सुट आघाडी सरकारच्या काळात दिली जात होती. मात्र नवीन सरकारने सबसीडी बंद केल्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला १०० टक्के रक्कम मोजण्याची वेळ आली असून सरकारने भात बियाण्याची सबसिडी रद्द केल्यामुळे वाढत्या महागाईमुळे महाग बियाणे खरेदी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चक्क गेल्या वर्षीचे जुने बियाण्याची पेरणी केल्यामुळे यंदा भात उत्पादन घटण्याची भिती व्यक्त होत आहे.
कोकणातील शेतकऱ्याला दिलासा म्हणून आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी शेतकऱ्याला भात बियाण्यावर सबसिडी देण्यात येत होती. परंतु आघाडी सरकार पाय उतार होवून शिवसेना - भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारकडून शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल अशी अपेक्षा होती. केंद्रात मोदी सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखविल्यामुळे राज्यातील भाजपा सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यासाठी ठोस निर्णय होवून भरघोस मदत मिळेल असे वाटत असतानाच भाजपा महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना मिळणारी भात बियाणे सबसिडी रद्द करुन चांगलेच कंबरडे मोडले आहे.
कोकणातील गरीब व छोटा शेतकरी उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत आहे. भातपीक सध्या परवडत नसून भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. आधीच भातशेतीसमोर मोठमोठी आव्हाने उभी असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना भातबियाण्यांवर देण्यात येणारे अनुदानही बंद केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.
उत्पन्नात घट होणार ?
वाढत्या महागाईमुळे गरीब शेतकऱ्याला भाताचे बियाणे खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यातच सबसिडी रद्द केल्यामुळे शेतकऱ्यानी जुने बियाणे पेरले आहे. हे बियाणे उगवलं तर उत्पादनात घट होईल. त्याला सरकार जबाबदार असेल. कोकणातील शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. अच्छे दिन हेच का? जर शेतकऱ्यांचाच कणा मोडला जात असेल तर भविष्यात शेती कोण करेल ?
- संजय कदम,
आमदार