चुरशीने सरासरी ७० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:13 AM2017-10-17T00:13:45+5:302017-10-17T00:13:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत सर्वाधिक मतदान झाले आहे. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी ६१ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. १२ ग्रामपंचायतींत सरपंचपद, तर १३ ग्रामपंचायतींत सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. काही ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी अर्जच आलेले नाहीत. त्यामुळे आता अंतिमत: जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतींपैकी १४८ ग्रामपंचायतींच्या एकूण ६६५ प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात सरंपचपदांसाठी ४०८, तर सदस्यपदांसाठी २०३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच २९ ग्रामपंचायतींत केवळ सरपंचपदासाठी आणि २३ ग्रामपंचायतींत केवळ सदस्यांच्या निवडणुकांसाठी सोमवारी मतदान झाले.
जिल्ह्यात ४७३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. किरकोळ घटना वगळता उर्वरित ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. दुपारी ३.३० वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले.
तालुक्यातील ग्रामीण भागातून अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. चिपळूण, दापोली या तालुक्यांमध्ये सर्वांत जास्त, तर राजापूर तालुक्यात कमी मतदान झाले आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. या यंत्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने त्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी आज, मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. यासाठीही पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.