चिपळुणात वणवामुक्त गाव स्पर्धेसाठी १६ गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:09+5:302021-03-17T04:32:09+5:30

अडरे : चिपळूणमधे यावर्षी वणवामुक्त कोकण संघटनेच्या माध्यमातून कोकणातील वणव्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेचा ...

Selection of 16 villages for forest free village competition in Chiplun | चिपळुणात वणवामुक्त गाव स्पर्धेसाठी १६ गावांची निवड

चिपळुणात वणवामुक्त गाव स्पर्धेसाठी १६ गावांची निवड

Next

अडरे : चिपळूणमधे यावर्षी वणवामुक्त कोकण संघटनेच्या माध्यमातून कोकणातील वणव्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून ‘वणवामुक्त गाव’ ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी चिपळूण परिसरातील १६ गावांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २५ हजार, द्वितीय क्रमांक १५ हजार, तृतीय क्रमांक १० हजार व उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ हजाराची २ बक्षिसे तसेच प्रमाणपत्र व चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही बक्षिसे गावाच्या उपयोगाच्या वस्तू स्वरुपात १५ ऑगस्ट राेजी एका विशेष कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी टेरव, खेर्डी, कळंबस्ते, धामणवणे, कापसाळ, कामथे, कळवंडे, धामणदेवी, पेढे, परशुराम, मिरजोळी, वालोटी, शिरळ, भागाडी, पाचाड, कालुस्ते ही १६ गावे निवडण्यात आली आहेत.

या स्पर्धेसाठी गावात पावसाळ्यापर्यंत वणवा न लागणे, वणवा लागू नये म्हणून गावाने केलेले प्रयत्न, वणवा लागलाच तर तो विझवला किंवा विझवण्याचा प्रयत्न केला, वणवामुक्त गाव संकल्पनेबाबत जनजागृती इत्यादी बाबींचा विचार करून विजेते ठरवण्यात येतील. वणव्यामुळे वनस्पती, प्राणी, पक्षी यांची अपरिमित हानी होते. तसेच तापमानात वाढ होते व मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे सर्व थांबावे, यासाठी वणवामुक्त कोकण समिती विविध प्रकारे प्रयत्न करत आहे.

चाैकट

वणवामुक्त कोकण समितीचे सभासद स्वतंत्रपणे एका गावाची जबाबदारी घेऊन वरील उपक्रमाबाबत संपूर्ण माहिती घेईल व अहवाल समितीला सादर करील. या कामामध्ये गावातील सरपंच, पोलीसपाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामसेवक या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य घेतले जाईल. या स्पर्धेसाठी एक विशेष समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सर्व गावांची माहिती अभ्यासून अंतिम निर्णय घेईल.

काेट

संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. अनेक गावांमध्ये लागलेले वणवे ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोळा गावातील पदाधिकारी व नागरिक यांनी आपला गाव वणवामुक्त राहील, याची काळजी घेऊन ‘वणवामुक्त गाव’ स्पर्धेत सहभागी व्हावे.

- रामशेठ रेडीज, अध्यक्ष, वणवामुक्त गाव

Web Title: Selection of 16 villages for forest free village competition in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.