शासकीय तंत्रनिकेतनच्या ४१ विद्यार्थ्यांची विविध नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:38+5:302021-07-25T04:26:38+5:30
रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या सुमारे ४१ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती ...
रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या सुमारे ४१ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य ए. एम. जाधव व प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. एफ. एच. पिंजारी यांनी दिली.
देशातील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनी -३३ , जी.ई. इंडिया -६, सीएट इंडिया -१ , फिलिप्स इंडिया-१ या कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली असून, यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या-२८ , इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या-११ , इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी ही इंजिनिअरिंगचे शिक्षण देणारी कोकण विभागातील एक अग्रगण्य संस्था आहे. संस्थेचे विद्यार्थी सरकारी तसेच खासगी क्षेत्रात देश- विदेशात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. संस्थेत इंजिनिअरिंगचे एकूण सहा अभ्यासक्रम शिकविले जातात. यात सिव्हिल इंजिनिअरिंग , मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व मेकॅक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग या शाखांचा
समावेश आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेऊन तंत्रनिकेतनच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिकत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा म्हणून सहा आठवड्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. अल्पसंख्याक प्रवर्गातील
विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र तीन अभ्यासक्रम शिकविले जातात.
या यशाबद्दल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तसेच संस्थेचे प्राचार्य ए. एम. जाधव यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना
नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरिता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी सर्वतोपरी जबाबदारी पार पाडत आहेत.