नुईद काझी यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:31 AM2021-04-07T04:31:29+5:302021-04-07T04:31:29+5:30
कृषी पदविका अनिवार्य रत्नागिरी : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले ...
कृषी पदविका अनिवार्य
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे कृषी पदवी, पदविका, शैक्षणिक अर्हता नाही, त्यासाठी आझाद हिंद विकास संस्थेतर्फे जिल्ह्यास एका वर्गास मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारतर्फे हैद्राबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन संस्थेतर्फेे एक वर्ष अभ्यासक्रम सुरू केला आहे.
क्रीडा साहित्याचे वाटप
चिपळूण : येथील रेणुकामाता नागा विद्यार्थिनी छात्रावास व रा.स्व.संघ जनकल्याण समितीचा उपक्रम म्हणून पूर्वांचल राज्यातील विद्यार्थिनीसाठी छात्रावास चालविण्यात येते. पुणे येथील संकल्प अभिनव भारत फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थिनीसाठी क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
आर्यन बहुतलेचे यश
चिपळूण : जिल्हा परिषद आदर्श शाळा धामणदेवी शाळेचा विद्यार्थी आर्यन संजय बहुतले याने डेरवण येथे झालेल्या युथ गेम्स या राज्यस्तरीय स्पर्धेत योगासन खेळामध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये दुसरा क्रमांक मिळविला. लॉकडाऊन कालावधीत हा विद्यार्थी आपला सराव नियमित करीत होता.
सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
दापोली : येथील जेसीआयतर्फे नगरपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा ‘सॅल्युट द सायलेंट वर्कर्स’ अंतर्गत सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण सेवा बाजावली. यावेळी एकूण ३६ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा परवीन शेख यांनी जेसीआयचे विशेष कौतुक केले.
कर्मचाऱ्यांना किमान वेतन
रत्नागिरी : कोरोना महामारी रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत आगामी आर्थिक वर्षात कर वसुलीशी निगडित वेतन न देता किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना होणार आहे. कोरोना काळात करवसुलीत पिछाडीवर असणाऱ्या ग्रामपंचायतींनाही याचा लाभ मिळणार आहे.
पर्यटकांच्या संख्येत घट
गणपतीपुळे : कोरोनामुळे कडक निर्बंध जाहीर करताना शासनाने धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक स्थळे बंद करण्यात आल्याने पर्यटकांची संख्या घटली आहे. बहुतांश पर्यटक जिल्ह्यात गणपतीपुळे व पावस येथील मंदिरात दर्शनासाठी खास येत असतात. मात्र, आता मंदिरात प्रवेश बंद केला असल्याने जिल्ह्याबाहेरील पर्यटकांचे आगमन थांबले आहे.
विश्वेश चिखले यांचा सत्कार
खेड : येथील योग शिक्षक विश्वेश चिखले यांना राष्ट्रीय खेल एवंम् शारीरिक स्वास्थ्य बोर्ड भारत यांच्यातर्फे महागुरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली अनेक वर्षे योग विद्येचा प्रचार, प्रसार होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात एकमेव एसीपी डिप्लोमा इन योगा महाविद्यालय सुरू झाले आहे.
मोबाइल टॉवरला मंजुरी
राजापूर : तालुक्यात चार ठिकाणी खासगी कंपनीच्या टॉवरला मंजुरी मिळाल्याने ग्राहकांची गैरसोय दूर झाली आहे. तालुक्याची भौगोलिक रचना डोंगराळ असल्याने अनेक ठिकाणी चांगली रेंज मिळत नाही. सध्या शिक्षणासह अनेक शासकीय कामे ऑनलाइन सुरू आहेत. नेटवर्कचा फटका कामकाजाला बसत होता.
गणेश घाट बांधण्याची मागणी
राजापूर : शहरात बंगालवाडीतील नागरिकांनी वरची पेठ येथे गणेशघाट व शासकीय विश्रामगृहात शेड उभारण्याची मागणी आमदार राजन साळवी यांच्याकडे केली आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे काम जोरात सुरू असून हे काम करीत असताना बांगालवाडी येथील सार्वजनिक शेड तोडण्यात आली आहे. गणेश विसर्जनावेळी शेडमध्ये गणपती एकत्र आणण्याची प्रथा आहे.