रत्नागिरी जिल्ह्यातील सिद्धेश तटकरेची प्रो-कबड्डीत धडक, बंगाल वॉरियर्सच्या संघात झाली निवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:50 PM2024-12-03T16:50:12+5:302024-12-03T16:51:38+5:30

संगमेश्वर तालुक्यातील पहिलाच खेळाडू

Selection of Siddesh Tatkare from Ratnagiri district in Bengal Warriors team in Pro-Kabaddi | रत्नागिरी जिल्ह्यातील सिद्धेश तटकरेची प्रो-कबड्डीत धडक, बंगाल वॉरियर्सच्या संघात झाली निवड 

रत्नागिरी जिल्ह्यातील सिद्धेश तटकरेची प्रो-कबड्डीत धडक, बंगाल वॉरियर्सच्या संघात झाली निवड 

सचिन मोहिते

देवरुख : ध्येय उराशी बाळगून त्याचा पाठलाग करणारी ध्येयवेडी माणसं आपलं ध्येय साध्य करतातच. याच जिद्दीच्या आणि कठोर मेहनतीच्या जोरावर संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणेसारख्या ग्रामीण भागातील सिद्धेश प्रमोद तटकरे या कबड्डीपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. मेहनतीच्या जोरावर त्याची बंगाल वॉरियर्सच्या संघात निवड झाली आहे. प्रो-कबड्डीत निवड झालेला तो तालुक्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

लाल मातीतील या मर्दानी खेळात तालुक्यातील अनेक खेळाडू निर्माण झाले आहेत. साडवली सह्याद्रीनगर गावातील प्रशांत सुर्वे यांच्यासारखे काही व्यावसायिक खेळाडू नावारूपाला आले. याच लाल मातीतून सिद्धेश तटकरे हा खेळाडू घडला आहे. त्याला शालेय जीवनापासूनच कबड्डीची आवड हाेती. त्याच्या वडिलांनाही कबड्डीची आवड असल्याने इथूनच त्याच्या कबड्डीच्या प्रवासाला सुरूवात झाली. माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाणे येथे दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना अभिजीत सप्रे तर दादासाहेब सरफरे बुरंबी-शिवने विद्यालयाचे शिक्षक सुहास पाब्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ताे घडत गेला.

याच दरम्यान तो जाखमाता ताम्हाणे, सोळजाई देवरुख संघातून खेळत होता. त्यावेळी त्याला संतोष उर्फ बाबा दामुष्टे यांचे मार्गदर्शन मिळाले. मुंबईत आल्यानंतर नाेकरी सांभाळून अंकुर, युनियन बँक, न्यू इंडियन इन्श्युरन्स या संघातून ताे खेळू लागला. सहा महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या संघातूनही ताे खेळला. मुंबईत त्याला प्रशांत सुर्वे, अनिल घाटे, मिलिंद कोलते, सुभाष पाटील, अक्षय मेरठ, महेश साप्ते, मीनल पालांडे, जसपाल राठोड, गणेश म्हात्रे यांचे मार्गदर्शन मिळाले.

मी कधीही सण, उत्सव पाहिले नाहीत. ध्येय डोळ्यासमोर ठेवून सण आणि उत्सवाला गौण स्थान दिले. खेळासाठी फिटनेस आणि स्वतःवर फोकस महत्त्वाचा आहे. फिटनेससाठी मला प्रशांत साळुंखे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. माझ्या पाठोपाठ संगमेश्वरमधील आणखी खेळाडूंनी प्रो-कबड्डीमध्ये यावे. त्यासाठी एकत्र खेळा, खूप कष्ट करा आणि उद्दिष्ट निश्चित करून यश गाठा. - सिद्धेश तटकरे

Web Title: Selection of Siddesh Tatkare from Ratnagiri district in Bengal Warriors team in Pro-Kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.