‘प्रधानमंत्री आदर्श ग्राम’साठी रत्नागिरी जिल्ह्यातील सुसेरी गावाची निवड
By शोभना कांबळे | Published: December 30, 2023 06:50 PM2023-12-30T18:50:24+5:302023-12-30T18:51:15+5:30
रत्नागिरी : खेड तालुक्यातील सुसेरी गावाची निवड ‘प्रधानमंत्री आदर्श ग्राम’साठी झाली आहे. त्यामुळे या गावाच्या विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून २० ...
रत्नागिरी : खेड तालुक्यातील सुसेरी गावाची निवड ‘प्रधानमंत्री आदर्श ग्राम’साठी झाली आहे. त्यामुळे या गावाच्या विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून २० लाख रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. आदर्श ग्रामसाठी निवड झालेले खेड तालुक्यातील हे दुसरे गाव आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी दिली.
ज्या गावामध्ये ४० टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या अनुसुचित जातीतील किंवा नवबाैद्ध समाजाची असेल, त्या गावाची ‘प्रधानमंत्री आदर्श ग्राम’साठी निवड केली जाते. केंद्र सरकारकडूनच लोकसंख्येच्या निकषावरून अशा गावांची नावे निश्चित केली जातात.
२०२२ -२३ या या वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात अनुसुचित जाती प्रवर्गातील ४० टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नांदगाव खुर्द (ता. चिपळूण), दाभोळे (ता. संगमेश्वर) आणि अलसुरे (ता. खेड) या गावाची निवड ‘आदर्श ग्राम’साठी करण्यात आली होती. या तीन गावांपैकी नांदगाव खुर्द आणि दाभोळे या गावांमधील नियोजित कामे पुर्ण झाल्याने या गावांना २० लाखांचा निधी केंद्र सरकारकडून मिळाला. तसेच या दोन गावांना ‘कम्युनिटी हाॅल’ मंजूर झाला आहे. यासाठी या गावांना २५ लाख रूपयांचा निधी या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
यावर्षी २०२३-२४ या वर्षासाठी आता खेड तालुक्यातील सुसेरी या दुसऱ्या गावाची निवड ‘प्रधानमंत्री आदर्श ग्राम’साठी केंद्राकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या या योजनेतून आता या गावातील विकास कामे वेगाने होणार आहेत.