रेल्वे युनियनची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:09+5:302021-07-14T04:37:09+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या युनियनची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ४ आणि ५ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. या ...
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या युनियनची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ४ आणि ५ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. या संदर्भातील अधिसूचना नुकतीच जाहीर झाली असून, मतदार याद्या बनविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
आवाशी : खेड तालुक्यातील हर्णै येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक १ मध्ये गेली सात वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या रूपाली पाटील नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्त त्यांचा केंद्रप्रमुख सखाराम मोहिते, विस्तार अधिकारी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
एटीएममध्ये खडखडाट
मंडणगड : कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील सर्वच एटीएम केंद्र आठवड्याच्या शेवटी दोन दिवस बंद राहत आहेत. त्यामुळे तालुक्यातील तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याबाबत बँक व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन बँकेच्या वरिष्ठांनी त्याचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.
सायबर क्राइममध्ये वाढ
रत्नागिरी : जिल्ह्यात यापूर्वी सायबर क्राइम कमी प्रमाणात होते. परंतु आता हळूहळू वाढू लागले आहेत. फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या घटनाही आता जिल्ह्यात वाढू लागल्या आहेत. हॅकर बनावट फेसबुक अकाउंटवर पैशाची मागणी करीत असल्याने या मायाजालात अनेकजण फसू लागले आहेत.
शिक्षकांना डोकेदुखी
रत्नागिरी : सध्या शिक्षकांवर ऑनलाइन शिकवणीची जबाबदारी आहेच. त्याचबरोबर इतरही नवनवीन कामांना त्यांना जुंपले जात आहे. सध्या कोरोनाच्या काळात त्यांना पोलीसमित्र म्हणून काम करावे लागत आहे. त्यातच आता नवीन दुसऱ्या कामाचा फतवा निघाला असून, या शिक्षकांना सहव्याधी असलेल्या मुलांचा शोधही घ्यावा लागत आहे.
मास्क कारवाया वाढल्या
रत्नागिरी : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने जिल्ह्याला दिलासा मिळत आहे. मात्र यामुळे काही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी निर्माण झाली आहे. मास्क न वापरणाऱ्या अशा नागरिकांवर आता पोलिसांनी करडी नजर ठेवण्यास प्रारंभ केला आहे.
बळीराजा सुखावला
मंडणगड : गेल्या आठवड्यात पाठ फिरविलेल्या पावसाने या आठवड्यात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामाने वेग घेतला आहे. रखडलेली भातलावणी आता सुरु झाली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. परंतु यासाठी सध्या काही शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्य तपासणी
खेड : लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि खेड तालुका आरोग्य विभाग यांच्या सौजन्याने वाडी जैतापूर आणि बेलदार येथे अॅण्टिजेन चाचणी करण्यात आली. याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. या दुर्गम गावांमध्ये झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ ५० ग्रामस्थांनी घेतला.
अध्यक्षपदी कदम
आवाशी : कोकण खेड युवा शक्तीच्या अध्यक्षपदी अभिजित कदम यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड येथील पार्वती पतसंस्था सभागृहात मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या वतीने उत्कर्ष मंडळ गोरिवलेवाडी कोतरूड येथे आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशासेविका आणि आरोग्य कर्मचारी यांचा कोविडयोद्धा म्हणून सन्मानचिन्हाने गौरव करण्यात आला. या कर्मचाऱ्यांनी कोरोना आपत्तीत घरोघरी जाऊन लसीकरण तसेच आरोग्य तपासणी केली.