सावरी येथील स्वराज घोसाळकर याची राष्ट्रीय संरक्षण अकादमीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:00+5:302021-07-16T04:23:00+5:30
मंडणगड : राष्ट्रीय संरक्षण अकादमीने २०२०मध्ये घेतलेल्या देशपातळीवरील परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत तालुक्यातील सावरी येथील स्वराज शशांक घोसाळकर याने देशात ...
मंडणगड : राष्ट्रीय संरक्षण अकादमीने २०२०मध्ये घेतलेल्या देशपातळीवरील परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत तालुक्यातील सावरी येथील स्वराज शशांक घोसाळकर याने देशात १४९ वा क्रमांक मिळवला. त्याने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे.
मुंबईतील अंधेरी येथे वास्तव्याला असणारी स्वराजची आई सुरक्षा घोसाळकर व वडील शशांक घोसाळकर यांनी त्याच्या जन्मापासून तो सैनिक अधिकारी होण्यासाठी पूर्वनियोजन केले होते. शिक्षक मार्गदर्शक व पालक यांच्या आज्ञेचे पालन केल्याने स्वराजने केंद्रीय विद्यालय आय. आय. टी., पवई शाळेत दहावीला ९२ टक्के गुण प्राप्त केले. अभ्यासासोबत धनुर्विद्येत राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक, स्काऊटचा राज्य पुरस्कार, पाचवी ते दहावी सी कॅडेटचे प्रशिक्षणात विशेष प्राविण्य मिळवले.
बारावी सायन्ससोबत एन. डी. ए.च्या पूर्व तयारीसाठी त्याला आर्म फोर्स प्रिपेटरी इन्स्टिट्यूट, कोल्हापूरचे चेअरमन विश्वास कदम, संचालक मेजर चंद्रसेन कुलथे यांच्यासोबत एन. सी. सी.चे दिलीप नारकर, कर्नल सुकुमारन, शारीरिक प्रशिक्षक शिवशंकर वाले, धनुर्विद्या प्रशिक्षक वैभव सागवेकर, भारत स्काऊट गाईड संस्थेचे राष्ट्रीय प्रशिक्षक संतोष परंडवाल यांचे मार्गदर्शन लाभले.