कारवाईच्या आश्वासनानंतर आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:30 AM2021-03-19T04:30:56+5:302021-03-19T04:30:56+5:30
khed-photo181 खेड येथे रिपाइंच्या आत्मदहन आंदोलनप्रकरणी उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला ...
khed-photo181 खेड येथे रिपाइंच्या आत्मदहन आंदोलनप्रकरणी उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : मागासवर्गीय निधीचा गैरवापर करणाऱ्याची चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला हाेता. याबाबत उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी चौकशी समिती स्थापन करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आत्मदहन आंदोलन तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याची माहिती रिपाइंचे कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुुशांत सकपाळ यांनी दिली.
खेड तहसीलदार कार्यालयात समाज कल्याण अधिकारी, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्या उपस्थितीत भरणे ग्रामपंचायत हद्दीतील भडगाव हद्द ते भरणे बाईतवाडी ते बौद्धवाडी येथे साकवाच्या निधी गैरव्यवहारप्रकरणी रिपाइंने केलेल्या आंदोलनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. या चाैकशीत अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन रिपाइंच्या आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे.
मात्र, बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन या पुढे सुरू राहील व त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असे रिपाइंचे कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष रजनीकांत जाधव, युवक अध्यक्ष विकास धुत्रे, महिला आघाडी अध्यक्ष रेश्मा तांबे, मिलिंद तांबे, आर. पी. येलवे, युवा नेते गणेश शिर्के, जितेंद्र तांबे, सखाराम सकपाळ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.