स्वबळ, अपक्षांमुळे उमेदवार वाढले

By Admin | Published: October 30, 2016 11:12 PM2016-10-30T23:12:00+5:302016-10-30T23:12:00+5:30

निवडणुकीची धामधूम : अपक्ष उमेदवारांचा भाव वधारणार; अर्ज मागे घेण्यासाठी ‘गळ’

Self, independents have increased the candidates | स्वबळ, अपक्षांमुळे उमेदवार वाढले

स्वबळ, अपक्षांमुळे उमेदवार वाढले

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर नगर परिषदांबरोबरच दापोली नगरपंचायतीसाठी निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. जिल्हाभरातील एकूण १०७ जागांसाठी ४७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात युतीची बोलणी फिसकटल्याने शिवसेना - भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची संख्या वाढली आहे, तर अपक्ष उमेदवारांचाही अधिक भरणा असल्याचे दिसत आहे. ६९ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केल्याने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अपक्षांना माघार घेण्यासाठी गळ घालण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीत अपक्षांचा भाव चांगलाच वधारणार असल्याचे दिसत आहे.
ऐन दिवाळीतच निवडणूक जाहीर झाल्याने फटाके जोरात फुटू लागले आहेत. या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. त्यातच जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांची संख्या दुप्पट झाली आहे. या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे करून एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या उमेदवारांची संख्या फारसी वाढणार नसल्याचे दिसत आहे. चिपळूणमध्ये मात्र आघाडीची बोलणी फिसकटल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. एरव्ही निवडणुकीच्या रिंगणात हे चारही पक्ष युती आणि आघाडी करून उतरत असल्याने पक्षांच्या उमेदवारांची संख्या तुलनेने कमी असते. त्यात अपक्षांचा भरणा मात्र अधिक असतो. यावेळेला मात्र सेना, भाजपच्या उमेदवारांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात १०७ जागांसाठी निवडणूक होत असून, रत्नागिरीत ३०, चिपळूणमध्ये २६ आणि खेड, राजापूर, दापोली येथे प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक लढविली जाणार आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर आणि दापोलीत सर्व जागांवर सेनेने उमेदवार उभे केले आहेत. भाजपने रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि दापोलीत उमेदवार केले आहेत, तर खेडमध्ये १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीने रत्नागिरीत २५, चिपळुणात २७, खेडमध्ये मनसेसोबत २५, राजापुरात ४, तर दापोलीत ११ उमेदवार उभे केल्याचे दिसत आहे. काँग्रेसने रत्नागिरीत ६, चिपळुणात २२, खेडमध्ये ८, राजापुरात १४ आणि दापोलीत ६ उमेदवार उभे केल्याचे दिसत आहे.
या प्रमुख पक्षांबरोबरच रत्नागिरीत २६, चिपळुणात ६, राजापुरात १५ आणि दापोलीत ३९ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे प्रमुख पक्षांबरोबरच अपक्षांची संख्यादेखील वाढल्याचे दिसत आहे. यामध्ये कितीजण इतर पक्षांच्या गळाला लागून उमेदवारी मागे घेतात ते लवकरच स्पष्ट होईल.
रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड, दापोली या पाचही ठिकाणी सेना, भाजपचे स्वतंत्र उमेदवार उभे असल्याने दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. युती न करता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या पक्षांना कोण किती पाण्यात आहे, हे निवडणूक निकालानंतर कळणार आहे. चिपळूणमध्ये या दोन्ही पक्षांबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी निवडणूक महत्त्वाची आहे. खेडमध्ये मनसेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राजापूरमध्ये शिवसेनेबरोबरच काँग्रेस पक्षाची कसोटी पणाला लागणार आहे. त्यामुळे कोणते पक्ष बाजी मारतात, ते लवकरच कळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Self, independents have increased the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.