राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे ‘सेल्फी विथ खड्डे’ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:36 AM2021-08-24T04:36:14+5:302021-08-24T04:36:14+5:30
रत्नागिरी : शहरातील खड्ड्यांवरून रत्नागिरी नगर परिषद सोशल मीडियावर ट्रोल होत असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहरातील खड्ड्यांवरून नगरपरिषदेला लक्ष्य ...
रत्नागिरी : शहरातील खड्ड्यांवरून रत्नागिरी नगर परिषद सोशल मीडियावर ट्रोल होत असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहरातील खड्ड्यांवरून नगरपरिषदेला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे ‘सेल्फी विथ खड्डे’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल हाेत आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या सुधारित नळपाणी योजनेच्या पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील सर्वच रस्त्यांची खोदाई करण्यात आली. त्यामुळे मोठे चर रस्त्यांवर पडले. अर्धा रस्ताच पाईपलाईनखाली गेल्याने शहरातील रस्त्यांची रुंदीही कमी झाली आहे. काही ठिकाणी तर भर पावसात रस्ते खोदाई झाली आणि त्यानंतर शहरात चिखलाचे साम्राज्य पसरले. त्याचबराेबर आता शहरातील रस्तेही खड्डेमय झाले आहेत.
शहरातील रामनाका, बसस्थानक परिसर, जेलरोड, गाडीतळ ते परटवणे, मांडवी, कॉंग्रेस भुवन ते खालची आळी आदी रस्ते तर नामशेष झाले आहेत. या परिसरात खड्ड्यांचेच साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप युवा मोर्चाने खड्डे बुजवा मोहीम हाती घेतली हाेती. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनोेख्या स्पर्धेेचे आयोजन केले आहे.
शहरात खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने ‘सेल्फी विथ खड्डे’ अशा आशयाची पोस्ट राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. या स्पर्धेचे ठिकाण रामनाका ते राधाकृष्ण नाका, गोखले नाका ते गाडीतळ, जेलरोड ते डीएसपी बंगला, फाटक हायस्कूल ते परटवणे, मांडवी बीच ते भुतेनाका व भुतेनाका ते कॉंग्रेेस भुवन, असे असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट सेल्फीला आकर्षक बक्षीसही देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. स्पर्धेसाठी मंदार नैकर, रवी शिंदे, नागेश जागुष्टे, संजीव गांधी, मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.