सेनेच्या नगराध्यक्ष उमेदवारीचा तिढा सुटेना
By Admin | Published: October 26, 2016 11:57 PM2016-10-26T23:57:01+5:302016-10-27T00:03:49+5:30
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक : ‘मातोश्री’वर बैठक; चिठ्ठी टाकून ठरणार उमेदवार
रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्षपदाची सेनेची उमेदवारी निश्चित करण्याचा ‘मातोश्री’ बंगल्यावरील दुसरा मुहूर्तही फोल ठरला आहे. बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तिघेही इच्छुक आग्रही राहिल्याने चिठ्ठ्या टाकून उमेदवार ठरविला जाणार आहे. आज, गुरुवारी किंवा उद्या, शुक्रवारी ही निवड जाहीर होणार आहे.
रत्नागिरीतून सेनेतर्फे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी बंड्या साळवी, मिलिंद कीर व राहुल पंडित हे तिघेजण इच्छुक आहेत. हे सर्व विद्यमान नगरसेवक असून, कीर हे माजी नगराध्यक्ष आहेत, तर साळवी व पंडित हे दोन्ही माजी उपनगराध्यक्ष आहेत. चार दिवसांपूर्वीच या तिघांना नगराध्यक्ष उमेदवारीबाबत एकमत करण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावले होते. त्यावेळी केवळ दोन मिनिटांची भेट झाली. तीनही उमेदवारांनी पुढील चार दिवसांत एकाच नावावर मतैक्य घडवून आणावे, असे उद्धव ठाकरे यांनी तिघांनाही सांगितले आणि उमेदवारी निश्चितीचा चेंडू इच्छुकांच्याच कोर्टात टाकला होता.
मात्र, तिघेही इच्छुक उमेदवारीसाठी आग्रही राहिले. मतैक्य होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिघांनाही पुन्हा ‘मातोश्री’वरून बुधवारच्या भेटीचे निमंत्रण देण्यात आले. त्यानुसार तिघेही इच्छुक बुधवारी ‘मातोश्री’वर दाखल झाले. सकाळपासून तिष्ठत असलेल्या इच्छुकांना दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी भेटीस बोलावले. पाच मिनिटे चर्चा झाली. मतैक्य होत नसल्याचे त्यावेळीही स्पष्ट झाले. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविला जाईल हे मान्य आहे काय, अशी विचारणा ठाकरे यांनी केली. त्याला तीनही इच्छुकांनी अनुकूलता दर्शवली. त्यामुळे आज किंवा उद्या नावांच्या चिठ्ठ्या टाकून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविला जाईल, असे पक्षप्रमुख ठाकरे यांनी इच्छुकांना सांगितले आहे. यानंतर तीनही इच्छुक ‘मातोश्री’वरून रत्नागिरीकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)
वावड्यांना ऊत...
सेनेच्या रत्नागिरी नगराध्यक्ष उमेदवारीबाबत ‘मातोश्री’ बंगल्यावर सुरू असलेल्या घडामोडींकडे रत्नागिरीकरांचे सातत्यपूर्ण लक्ष होते. उमेदवारी मिळाली, जाहीर झाली, अशा वावड्याही उठविल्या जात होत्या. मात्र, दुपारी ३ वाजल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट झाले. तिढा तसाच राहिल्याने आता या उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार? याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.
उमेदवार निश्चित?
चिठ्ठ्यांद्वारे उमेदवार निश्चिती होणार, असे स्पष्ट झाल्यानंतरही सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव आधीच नक्की झाले आहे, असे शहरात अनेक ठिकाणी ठामपणे सांगितले जात होते. त्यामुळे चिठ्ठ्यांआधी उमेदवार निश्चिती की चिठ्ठ्यांनंतर उमेदवार निश्चिती, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती.