राजापुरात ज्येष्ठ नागरिक लसीकरणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:28+5:302021-05-07T04:33:28+5:30
राजापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दुसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, ...
राजापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दुसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, संसर्गाचा जास्त धोका असलेल्या ४५ ते पुढील वयोगटासाठी लसीकरण तूर्तास बंद करण्यात आल्याने या वयोगटातील अनेक लोकांना लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाने सुरुवातीच्या काळात लस उपलब्ध झाल्यावर फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांबरोबर ४५ ते ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे धोरण अवलंबले. प्रशासकीय स्तरावर प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. मात्र, ४५ ते ६० वर्षांपुढील वयोगटासाठी लसीकरणासाठी सर्वसामान्य जनतेत म्हणावी तशी जनजागृती न झाल्याने अनेक जण या लसीकरणापासून वंचित राहिले आहेत.
सध्या शासनाने या पहिल्या टप्प्यातील लोकांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक असताना दुसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण हाती घेतले आहे. त्यामुळे ४५ ते पुढील वयोगटातील वंचित लाभार्थींची या लसीकरणासाठी परवड होत असून, लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाने ६० वर्षांवरील नागरिकांना संसर्गाचा असलेला जास्तीचा धोका लक्षात घेता या टप्प्यातील लाभार्थींना प्राधान्याने पहिला डोस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. लसीच्या तुटवड्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी शासनाच्या सुरुवातीच्या काळात ४५ ते पुढील वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीचा डोस दिला. मात्र, या लसीच्या तुटवड्यामुळे सुरुवातीला या लसीचा डोस घेतलेल्या अनेकांना दुसऱ्या डोससाठी मुदत संपूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. आता दुसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिन उपलब्ध झाली असली तरी पहिल्या टप्प्यातील नोंदणीच बंद करण्यात आल्याने लस उपलब्ध होऊनही दुसरा डोस घेता येत नसल्याची परिस्थिती आहे. शासनाने लसीकरणाबाबत योग्य ते नियोजन करून पहिल्या टप्प्यात ज्यांना पहिला डोस मिळाला आहे अशांना दुसरा डोस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.