'ईडीचा तपास सोम्या गोम्याना समजतोच कसा?'; दिपक केसरकर यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 09:18 PM2022-02-18T21:18:29+5:302022-02-18T21:18:39+5:30
दीपक केसरकर यांनी गुरूवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राणेच्या आरोपांचा समाचार घेतला.
सावंतवाडी: केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जर मातोश्रीवरील चार जणांना ईडी लवकरच नोटीस बजावणार असे सांगत असतील, तर हा तपास यंत्रणेचा अपमान असून देशातील सर्वाच्च संस्थाचा तपास सोम्या गोम्याना समजतोच कसा, असा सवाल शिवसेना आमदार दिपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सुशांत सिंग प्रकरणाची फाईल पुन्हा उघडेल सांगायला राणे काय केंद्रीय गृहमंत्री आहेत का असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. केसरकर यांनी गुरूवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राणेच्या आरोपांचा समाचार घेतला.
सध्या महाराष्ट्रात कोणीही उठते आणि राज्य सरकारवर बोलतो जिकडे तिकडे ईडीची भिती घातली जाते हे योग्य नाही तुम्ही जेवढे महाविकास आघाडी तील नेत्यांना त्रास देणार तेवढे हे सरकार आणि पेटून उठेल. ईडी वैगरे या तपास यंत्रणा देशातील सर्वाच्च आहेत त्याचा गैरवापर होत असून सामान्य माणूस पण हे जाणून आहे त्यामुळे प्रत्येकाने ओळखले पाहिजे लोकशाहीत जनता महत्वाची असून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ही पराभूत व्हावे लागले होते.असेही आमदार केसरकर यावेळी म्हणाले.
राणे यांनी मातोश्री वरच्या चौघांना लवकरच ईडी नोटीस बजावेल असे म्हटले आहे यावरही केसरकर यांनी भाजप ला सल्ला दिला भाजपचे विचार आम्हाला समविचारी वाटायचे पण पण राणे सारखे नेते पक्षात घेऊन भाजप वेगळ्याच दिशेला वाहत जाऊ लागला आहे जेथे राणे तेथील सत्ता जाते हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लक्षात ठेवावे राणेंना सुधारण्याची संधी होती पण ते सुधारू शकत नाही संजय राऊत यांनी राणेवर आरोप केले नव्हते तरीही ते पुढे का आले असा सवाल ही केसरकर यांनी यावेळी करत सोम्या गोम्याना ईडी च्या कारवाया समजत असतील तर तपास यंत्रणेचे महत्व कुठे राहणार असा सवाल ही उपस्थीत केला.
सुशांत सिग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार असे राणे यांनी सांगायला ते काय केंद्रीय गृहमंत्री आहेत का? आणि सीबीआय ने अद्याप पर्यंत या तपासाची फाईल बंद केली नाही मग आणि कशी उघडणार काय फक्त बदनामीचा प्रकार सुरू आहे.या देशात अद्याप उच्च व सर्वाच्च न्यायालये आहेत एवढे लक्ष ठेवा जनता तुम्हाला कधी तरी जाब विचारेल त्यामुळेच उत्तर प्रदेश सारख्या राज्यात एक युवा नेतृत्व ही तुमची झोप उडवत असल्याचे केसरकर हे भाजप ला उद्देशून म्हणाले.