चिंताजनक, कोरोनाबाधित १५ रुग्णांच्या मृत्यूने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:33 AM2021-04-20T04:33:39+5:302021-04-20T04:33:39+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात प्रथमच २४ तासांत १५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४६४ झाली आहे, ...
रत्नागिरी : जिल्ह्यात प्रथमच २४ तासांत १५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४६४ झाली आहे, तर कोरोनाबाधितांची संख्या निम्म्यावर आली असून, सोमवारी २५९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण १५,८८९ कोरोनाबाधित झाले आहेत.
कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्याने, चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये युवकांपासून ते वृद्धांपर्यंत व्यक्ती असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर आवाहन उभे ठाकले आहे. वर्षभराच्या कालावधीत प्रथमच १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ४ रुग्ण, खेडमधील ६ रुग्ण, गुहागरातील ३ रुग्ण आणि चिपळूण, राजापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ११ पुरुष आणि ४ महिला कोरोना रुग्ण आहेत. रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून, २.९२ टक्के आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील १४८ रुग्ण तर अँटिजन चाचणीतील १११ रुग्ण आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात साेमवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची संख्या शून्य आहे, तर रत्नागिरी तालुक्यात ५३ रुग्ण, दापोलीत ४३, खेडमध्ये २२, गुहागरात ४, चिपळुणात ६३, संगमेश्वरमध्ये ५४, लांजात ५ आणि राजापुरात १५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण १२.१६ टक्के असून, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७६.९१ टक्के आहे.