पाणी चाेरी राेखण्यासाठी स्वतंत्र पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:29+5:302021-04-27T04:32:29+5:30
राजापूर : वाढत्या उष्म्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यातून, पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये नगरपरिषदेने कपात केली असून, गेले ...
राजापूर : वाढत्या उष्म्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यातून, पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये नगरपरिषदेने कपात केली असून, गेले काही दिवसांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाही सुरू केला आहे. मात्र, यामध्ये अवैधरीत्या होणारी पाणी चोरी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या पाणी चोरीच्या विरोधात नगरपरिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याच्यावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन केले आहे.
गेले काही दिवसांपासून हवेतील उष्मा कमालीचा वाढला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन भूगर्भातील पाणीसाठे खालावू लागले आहेत. ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधण्यात आलेले सायबाचे धरण गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरकरांची तहान भागवीत आहे. या धरणाच्या साठ्यावर वाढत्या उष्म्याचा प्रतिकूल परिणाम होऊन तेथील पाणीसाठा गेल्या काही दिवसांमध्ये खालावला आहे. त्यातून, तेथून होणारा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. त्यातून, खालावलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नगरपरिषदेतर्फे सद्य:स्थितीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यातच, पाणीटंचाईची वाढती स्थिती आणि विस्कळीतपणा लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून टँकरचीही तयारी करण्यात आली आहे.
वाढत्या उष्म्म्याची झळ पोहाेचून एकदिवसाआड शहरामध्ये होत असलेल्या पाणीपुरवठ्यामध्ये विविध भागांमध्ये होणारी पाणी चोरी नगरपरिषदेची प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. एप्रिल-मे महिन्यांतील पाणीटंचाई जशी शहरवासीयांची दरवर्षीची डोकेदुखी आहे तशी टंचाईच्या काळात होणारी पाणीचोरीही दरवर्षीची डोकेदुखी आहे. या पाणी चोरीच्या विरोधात नगरपरिषदेने यापूर्वी धडक कारवाई करताना पाणी चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले पंप जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्याप्रमाणेही प्रशासनाने पाणी चोरीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी चोरीवर वॉच ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथकही स्थापन करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रशासनाने पाणी चोरी करणाऱ्यांना पाणी चोरी थांबवा, अन्यथा धडक कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला आहे.