विलगीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:31 AM2021-05-10T04:31:28+5:302021-05-10T04:31:28+5:30
घरोघरी सर्वेक्षण राजापूर : तालुक्यातील दळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाचा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. ...
घरोघरी सर्वेक्षण
राजापूर : तालुक्यातील दळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाचा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. त्याचा शुभारंभ नाटेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आबासोा. पाटील यांच्या हस्ते झाला.
अपघातात घट
देवरूख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत घट झाल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. दरवर्षी अपघातामुळे होणारे मृत्यूचे तांडव कमी झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर एप्रिल -मे महिन्याच्या दरम्यान वाहतुकीची वर्दळ असते.
कायदेशीर कारवाई
राजापूर : गाव आणि तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आरोग्य पथक व ग्राम कृती दलांना सहकार्य करा, असे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे. आरोग्य पथके व ग्राम कृती दलाच्या सदस्यांशी गैरवर्तन केले तर त्याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
लसीकरणापासून वंचित
रत्नागिरी : पावस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिसरातील अत्यल्प नागरिकांचे लसीकरण होत आहे. रत्नागिरी शहर व अन्य तालुक्यांतील अत्यल्प नागरिकांचे लसीकरण होत आहे. रत्नागिरी शहर व अन्य तालुक्यातील जनता लस घेऊन जात असल्याबद्दल परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.
समुपदेशन केंद्र आजपासून
देवरूख : येथील मातृमंदिर कोविड केअर सेंटरसोबत नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालय संगमेश्वर टीम, पोस्ट कोविड केअर समुपदेशन केंद्र आणि ऑनलाइन व्हॅक्सिन रजिस्ट्रेशन सुविधेचे उद्घाटन सोमवार, दि.१० जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
टॅंकरची प्रतीक्षा
खेड : तालुक्यातील चिरणी-धनगरवाडी ग्रामस्थांनी टॅंकरच्या पाण्यासाठी अर्ज करूनसुध्दा टॅंकरने पाणीपुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना टॅंकरची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र एक-दोन दिवसांत या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
प्रवासासाठी सवलत
रत्नागिरी : आंबा, काजू , नारळ व अन्य फळबाग लागवडीसाठी कोकणातील प्रवासासाठी पुण्यातील कोकणी लोकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल तसेच गावी गेल्यानंतर अलगीकरण नियमांची काटेकोर अमंलबजावणी झाली पाहिजे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
आज रक्तदान शिबिर
चिपळूण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत असतानाच रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अहवानाला प्रतिसाद देत येथील युवा सेनेच्या वतीने दि. १० मे रोजी बांदल हायस्कूल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
वेतन अदा करण्याची मागणी
खेड : शासनाकडून गेले तीन महिने शिक्षकांचे वेतन अनियिमत होत आहे. अनुदानाची संपूर्ण रक्कम प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे वेतन थकले आहे. थकीत वेतन तत्काळ अदा करण्याची मागणी होत आहे.