कोरोना रोखण्यासाठी अख्खी वाडी स्वत:हून विलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:29 AM2021-04-15T04:29:39+5:302021-04-15T04:29:39+5:30
मंडणगड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक तीव्र असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच एप्रिल महिन्यामध्ये मंडणगड तालुक्यात कोरोनामुळे ...
मंडणगड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक तीव्र असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच एप्रिल महिन्यामध्ये मंडणगड तालुक्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यातील टाकेडे गावठणवाडीने जिल्ह्याला आदर्श ठरेल, अशी भूमिका घेतली आहे. या संपूर्ण वाडीने आठ दिवसांसाठी स्वत:हून विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक १३ एप्रिलपासून वाडीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाडीतील आठजण कोरोनाबाधित आढळल्याने गावप्रमुख सीताराम सुर्वे यांच्यासह वाडी कृतीदलाने गावात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सध्या जे रुग्ण आढळले आहेत, त्या बाधित लोकांना कोणताही त्रास नाही. गावातील काहीजण कोविड लसीकरणाकरिता गेले असता, तपासणीमध्ये ते बाधित असल्याचे आढळले होते. त्यापैकी तिघेजण बरे झाले आहेत. मात्र, असे असले तरी कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गावात जावून त्यांची तपासणी आणि औषधोपचार करत आहेत. त्याचबरोबर गावात अन्य कुणाला त्रास होत आहे का, याचीही पाहणी करत आहेत.
वाडीत रूग्ण सापडू लागल्यामुळे वाडीप्रमुख व वाडी कृतीदल यांनी वाडीतील ग्रामस्थांची बैठक बोलावली. कोरोनाचा संसर्ग रोखला जावा, वाडीतील किंवा वाडीबाहेरील अन्य कुणालाही त्रास होऊ नये, याकरिता आठ दिवसांसाठी अख्ख्या वाडीचे विलगीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या आठ दिवसांमध्ये वाडीतील कोणीही व्यक्ती वाडीबाहेर जाणार नाही किंवा बाहेरील कोणालाही वाडीत प्रवेश देण्यात येणार नाही, असे ठरविण्यात आले. एवढेच नाही तर गावातील लोकांना एकमेकांच्या घरी जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
दुसऱ्या लाटेत वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी वाडी कृतीदलाने विशेष पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील हे एकमेव उदाहरण असून, हाच आदर्श इतरही गावांनी, वाड्यांनी घेण्याची गरज आहे.
....................
काय आहेत वाडीचे निर्णय
१. वाडीतील कोणीही घराबाहेर पडणार नाही. एकमेकांच्या घरी जाणार नाही.
२. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला २० एप्रिलपर्यंत वाडीत प्रवेश दिला जाणार नाही.
३. शेतकरी शेतीची कामे स्वत:च करतील.
४. शासकीय सेवेत असणारे व नोकरी करणारे ग्रामस्थ आपली सेवा, कर्तव्य पार पाडतील. पण तेथून आल्यानंतर आपल्या घरातच थांबतील. त्यांनी वाडीतील अन्य कोणाच्याही संपर्कात येऊ नये.
...................
स्वतंत्र मदत यंत्रणा
संपूर्ण वाडी लाॅकडाऊन झालेली असताना कोणालाही कसली गरज भासल्यास किंवा तातडीची मदत हवी असल्यास वाडी कृती दलाकडे संपर्क साधायचा आहे. यानंतर वाडी कृतीदल त्यांना मदत करणार आहे व आवश्यक गोष्टी पुरवणार आहे. त्यासाठी वाडीत दोन रिक्षा तैनात ठेवण्यात आल्या असून, त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना गरजेच्या व अत्यावश्यक सेवा पुरवल्या जाणार आहेत. गावात फेरीवाले व वाडीबाहेरील लोकांनाही बंदी घातलेली आहे.