खेर्डीत ६० बेडचा विलगीकरण कक्ष सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:32+5:302021-06-09T04:39:32+5:30
चिपळूण : तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खेर्डी येथे ६० बेडचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. खेर्डी एमआयडीसीतील बीएसएनएलच्या ...
चिपळूण : तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खेर्डी येथे ६० बेडचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. खेर्डी एमआयडीसीतील बीएसएनएलच्या इमारतीत हा कक्ष सुरू झाला असून, महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. या विलगीकरण कक्षात गावातील १४ डाॅक्टर नियमितपणे मोफत सेवा देणार आहेत.
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गृह अलगीकरणाची सुविधा बंद केली. त्यामुळे दोन हजारांच्यावर लोकसंख्या असलेल्या गावांनी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्याची सूचना तालुका प्रशासनाने केली होती. त्यानुसार तालुक्यातील ३२ गावांमध्ये लोकसहभागातून विलगीकरण कक्ष उभारले जात आहेत. शहरालगतच्या खेर्डी येथील एमआयडीसीतील बीएसएनएलची इमारत बंद अवस्थेत होती. ही इमारत स्वच्छ करून त्याची दुरूस्ती करत तिथे विलगीकरण सुरू करण्यात आला आहे. येथे ६० बेडची व्यवस्था आहे. येथे अजून एक इमारत मोकळी असून, तिथेही कोविड सेंटर सुरू करण्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन आहे.
येथील विलगीकरण कक्षात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. येथे वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावातील खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. गावात १४ डॉक्टर असून, प्रतिदिन दोघे असे नियमितपणे आठवडाभर मोफत वैद्यकीय सेवा देणार आहेत. तर आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी औषधोपचार करणार आहेत. येथील सर्व खासगी कंपन्यांना विलगीकरण कक्षासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य विनोद भुरण यांनी केले आहे.
विलगीकरण कक्षातील बाधित रूग्णांची गावातीलच डॉक्टर नियमित तपासणी करणार असल्याने रूग्णांना दिलासा मिळणार आहे. गावात कोरोनाची साथ वाढू नये, यासाठी ॲंटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्यांवर ग्रामपंचायतीने जोर दिला आहे. यावेळी सरपंच वृंदा दाते, उपसरपंच विजय शिर्के, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, सदस्य विनोद भुरण, अभिजीत खताते, राकेश दाभोळकर, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.