टेरव येथे लोकसहभागातून उभारला विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:50+5:302021-06-09T04:39:50+5:30
चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे लोकसहभागातून विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. गावातील अनेक दानशूर ग्रामस्थांनी या कक्षासाठी मदत दिल; ...
चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे लोकसहभागातून विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. गावातील अनेक दानशूर ग्रामस्थांनी या कक्षासाठी मदत दिल; तर काहींनी श्रमदान केले. बाधित रुग्णांच्या मनोरंजनासाठी टीव्ही आणि साउंड सिस्टीमही ठेवण्यात आली आहे. या कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांना आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे.
गृह अलगीकरणाची सुविधा बंद झाल्यानंतर दोन हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या गावात विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायतींना दिल्या होत्या. तालुक्यातील टेरव येथेही लोकसहभागातून विलगीकरण कक्ष उभा राहिला. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सदस्य व किशोर कदम यांनी मेहनत घेतल्याने दानशूर लोकांनी सढळ हस्ते मदत दिली.
जिल्हा परिषद शाळेत हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र अशा एकूण १२ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या विलगीकरण कक्षासाठी ५० ते ६० हजारांची लोकवर्गणीही जमली आहे. लोकसहभागातून साकारलेल्या या कक्षाचे आमदार निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी सरपंच स्वप्नाली कराडकर, उपसरपंच मानसी कदम, ग्रामसेवक एम. टी. सुर्वे, माजी उपसरपंच किशोर कदम यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. विलगीकरण कक्षासाठी यशवंत कदम, चंद्रकांत कदम, सुदाम साळवी, नागेश कदम, मिलिंद कदम, राजेंद्र कदम, राजू वाडकर, प्रदीप कदम, शांताराम शिगवणकर, अनंत कदम, विश्वनाथ कदम, अनिल धामणस्कर, महादेव कदम, संतोष म्हालीम, शेखर लालन, आदींनी मदत दिली.
--------------------
चिपळूण तालुक्यातील टेरव येथे लाेकसहभागातून विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे़ या कक्षाला आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन पाहणी केली़