पोलिस दलाची ऐतिहासिक वाटचाल सांगणारे संग्रहालय उभारा : उदय सामंत
By शोभना कांबळे | Published: October 7, 2023 01:11 PM2023-10-07T13:11:16+5:302023-10-07T13:11:41+5:30
रत्नागिरी : पोलिस विभागाच्या प्रस्तावित प्रकल्पामध्ये पोलिस दलाची ऐतिहासिक वाटचाल सांगणारे संग्रहालय उभारा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी ...
रत्नागिरी : पोलिस विभागाच्या प्रस्तावित प्रकल्पामध्ये पोलिस दलाची ऐतिहासिक वाटचाल सांगणारे संग्रहालय उभारा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधितांना दिल्या.
रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांनी थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया, रत्नागिरी नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामे, पोलिस विभागाचा प्रस्तावित बांधकाम प्रकल्प, मंडणगड दिवाणी न्यायालय उद्घाटन व भूमिपूजन कामांचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सूर्यवंशी, सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर व संबंधित अधिकारी उपस्थित हाते.
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन प्रस्तावित इमारतीमध्ये संग्रहालयाची निर्मिती करण्यात यावी. यामध्ये पोलिस दलाचा इतिहास बदलत जाणारे त्यांचे पोशाख, ऐतिहासिक शस्त्रे यांची माहिती आणि वस्तू असाव्यात. हे संग्रहालय राज्यातील अनोखे व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.
मंत्री सामंत म्हणाले की, रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या नाट्यगृहाचे लोकार्पण २६ जानेवारी राेजी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने गतीने कामकाज करावे. ध्यान केंद्र, बुध्दांची गोल्डन मूर्ती याबाबत विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी दिली.
मंगल कार्यालयासाठी १ काेटी
सर्वसामान्यांना अत्यल्प खर्चात लग्नकार्य करता यावे, यासाठी मंगल कार्यालय उभारण्यासाठी १ कोटीचा निधी दिला जाईल. त्याचबरोबर वक्फ बोर्डाच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार त्यांच्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मंगल कार्यालयासाठी १ कोटी दिले जातील.