रब्बी हंगामात साडेसात हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:33 AM2021-04-28T04:33:52+5:302021-04-28T04:33:52+5:30
- भातलागवडीला प्राधान्य लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी शेती लागवडीकडे लक्ष केंद्रित केले होते. खरीप ...
- भातलागवडीला प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी शेती लागवडीकडे लक्ष केंद्रित केले होते. खरीप हंगामात पावसावर अवलंबून शेती केली जात असली तरी रब्बी हंगामातील शेतीकडे आता शेतकरी वळले आहे. यावर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांमुळे साडेसात हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात वाढ झाली असून रब्बी हंगामात भात लागवड प्राधान्याने करण्यात आली आहे. संगमेश्वर, दापोली, खेड आणि गुहागर तालुक्यांत लागवड करण्यात आली असून यावर्षी जिल्ह्यात १५ टक्के क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी शेतीच्या कामासाठी मात्र कोणतेही अडसर येत नाहीत. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील लागवडीबाबत असलेली उदासीनता झटकून चार हजार ५३८ शेतकऱ्यांनी सात हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे.
गतवर्षी चांगला पाऊस झाला. नोव्हेंबरपर्यत पाऊस होता. शिवाय अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बहुतांश गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे. उन्हाळी शेतीसाठी पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शेतीसाठी अवजारे, मजुरांची उपलब्धता यांवर मात करताना सामूहिक शेतीकडे कल वाढला आहे.
खरीप हंगामात शेती प्राधान्याने केली जात असली तरी रब्बी हंगामात शेतीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडील विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. बियाण्यांसाठी अनुदान, यांत्रिकीसाठी प्रोत्साहन, सिंचनाच्या योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येत आहे. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक मुंबईकर शेतीकडे वळले. नोकरी, रोजगार गमावल्यामुळे खरिपातील शेतीसाठी अनेक लोक गावीच राहिले. यावर्षीही रब्बीमध्ये शेतकऱ्यांनी लागवडीला प्राधान्य दिले असल्यानेच लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील चार हजार ५३८ शेतकऱ्यांनी सात हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. संगमेश्वर, दापोली, खेड आणि गुहागर तालुक्यांत सर्वाधिक लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी विशेषत: भातलागवडीवर भर दिला आहे. १५ टक्के क्षेत्रावर भात लागवड असून उर्वरित क्षेत्रावर भाजीपाला, कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे.
कोट घ्यावा :
कोकणातील शेतकरी बारमाही शेतीकडे वळू लागले आहेत. जिल्ह्यात भाजीपाला, कडधान्य, फळभाज्यांसह भात लागवड रब्बीत करू लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी बियाणे, त्यासाठी अनुदान, सवलतीच्या योजना, कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचाही त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.
- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.