चक्रीवादळाआधीच सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:33 AM2021-05-18T04:33:06+5:302021-05-18T04:33:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविल्याने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविल्याने वेळीच सतर्क होत येथील नगर परिषद प्रशासनाने रविवारी कोरोनाबाधित सात मृतदेहांवर सकाळच्या सत्रात अंत्यसंस्कार उरकून घेतले. रामतीर्थ स्मशानभूमीतील पत्र्याच्या शेडअभावी तेथील कामगारांचीही दमछाक होत आहे.
शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र तेथील पत्र्याची शेड दुरुस्तीसाठी काढल्याने व अद्याप नवीन शेड उभारण्यात न आल्याने अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. शनिवारी पावसामुळे एक मृतदेह अर्धवट स्थितीत जळाल्याचा प्रकार घडला होता. यामुळे शहरवासीयांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर तोंडसुख घेत संताप व्यक्त केला होता. हवामान खात्याने तौक्ते चक्रीवादळामुळे वादळ व पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे नगर परिषद प्रशासन व स्मशानभूमीतील कर्मचारी यांनी सतर्क राहून सकाळीच मृतदेहांना अग्नी दिला.
नगर परिषदेने स्मशानभूमी शेडबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.