दाऊदच्या खेडमधील सात मालमत्तांचा होणार लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 05:28 PM2020-10-20T17:28:22+5:302020-10-20T17:32:01+5:30
Dawood Ibrahim, Khed, Ratnagiri , online कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या तालुक्यातील मुंबके व लोटे येथील एकूण सात मालमत्तांचा तस्करी व विदेशी विनिमय हाताळणी कायद्यांतर्गत १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मुंबके येथील दोन मजली बंगल्यासह ६ जमिनी, आंबा कलमांची बाग व लोटेतील एका प्लॉटचाही समावेश आहे.
खेड : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या तालुक्यातील मुंबके व लोटे येथील एकूण सात मालमत्तांचा तस्करी व विदेशी विनिमय हाताळणी कायद्यांतर्गत १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मुंबके येथील दोन मजली बंगल्यासह ६ जमिनी, आंबा कलमांची बाग व लोटेतील एका प्लॉटचाही समावेश आहे.
ही लिलाव प्रक्रिया व्हिडिओ कॉन्स्फरन्सद्वारे होणार आहे. दाऊदचे मूळगाव मुंबके असले तरी १९८६नंतर तो मूळगावी फिरकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. १९७८मध्ये त्याने मुंबके येथे दोन मजली बंगला बांधला. मात्र, बहिणीच्या अकाली निधनाने बंगल्याकडे दुर्लक्षच होऊन बंगल्याचे काम अर्धवटच राहिले. १९९३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हा बंगला शासनाच्या ताब्यात गेल्यापासून ओस पडला होता.
जून २०१९ मध्ये त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या सर्व मालमत्तांचे ॲन्टी स्मगलिंग एजन्सीकडून मूल्यांकनही झाले होते. मुंबके येथील दाऊद व त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या दोन मजली बंगल्यासह एक एकर जागेत आंब्याच्या २५ ते ३० झाडांची बाग आहे. त्याचाही लिलाव करण्यात येणार आहे.
तसेच महामार्गावर लोटे औद्योगिक वसाहतीनजीक पेट्रोलपंपासाठी खरेदी केलेल्या एका प्लॉटचाही समावेश आहे. या साऱ्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त येथे धडकताच साऱ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे दाऊदच्या संपत्तीची लिलाव प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मात्र, आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लिलाव होणार आहे.
या संपत्तीच्या लिलावासाठी बोली लावणारे २ नोव्हेंबरला संपत्तीची पाहणी करू शकतात. त्यानंतर नोव्हेंबरला ४ वाजण्यापूर्वी संबंधितांना अर्ज करावा लागणार आहे. या अर्जासोबत डिपॉझिट जमा करावे लागणार आहे. यानंतर १० नोव्हेंबर रोजी ई-लिलाव, टेंडर तसेच सार्वजनिक असे तिन्ही पद्धतीने याचा लिलाव केला जाणार आहे.
एक - दोन दिवसांचा मुक्काम
मुंबईत राहात असताना दाऊद आई- वडिलांसोबत मुंबके येथे येत होता. एक - दोन दिवसांच्या वास्तव्यानंतर लगेचच मुंबईला परतत असे. मुंबईनंतर त्याचे कुटुंबीय परदेशात स्थायिक झाले.
मालक कोण होणार?
खेडमधील दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव होणार असल्याचे कळताच अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ही मालमत्ता कोणाच्या ताब्यात जाणार आणि कोण मालक होणार हेच पाहायचे आहे.
ऑनलाईन लिलाव
- १८ गुंठे जमिनीसाठी १ लाख २८ लाख राखीव किंमत आहे.
- २० गुंठे जमिनीसाठी १.५२ लाख
- २४.९० गुंठे जमिनीसाठी १,८९ लाख.
- २९.३० गुंठे जमिनीसाठी २.२३ लाख,
- २७ गुंठे जमिनीसाठी २.५ लाख.
- घर क्र. १७२ आणि २७ गुठे जमिनीसाठी ५.३५ लाख
- लोटेतील ३० गुंठे जमिनीसाठी ६१.४८ लाख राखीव किमत आहे.