लांजाजवळ अपघातात सात ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 05:11 AM2018-09-12T05:11:53+5:302018-09-12T05:12:08+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर लांजाजवळ कुवे येथे अवघड वळणावर कार आणि खासगी आराम बस यांची धडक झाल्याने कारमधील सात जण ठार झाले तर चार जण जखमी झाले.
लांजा (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर लांजाजवळ कुवे येथे अवघड वळणावर कार आणि खासगी आराम बस यांची धडक झाल्याने कारमधील सात जण ठार झाले तर चार जण जखमी झाले. कारमधील सर्व जण दहिसर पूर्वमधून (मुंबई) कोंड्ये (ता. राजापूर) येथे आपल्या गावी गणेशोत्सवासाठी येत होते. मंगळवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान हा अपघात झाला.
प्रियांका काशीराम उपळकर (२९), पंकज हेमंत घाणेकर (१९), भार्गवी हनुमंत माजळकर (६ महिने), तिचा भाऊ सार्थक (६), मानसी हनुमंत माजळकर (३0), राजेश बापू शिवगण (२६) तसेच मंगेश उपळकर (२६) अशी मृतांची नावे आहेत. मंगेश याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मुंबईच्या दहिसर पूर्व रावळपाडा भागात राहणारे उपळकर व माजळकर कुटुंबीय गणेशोत्सवासाठी आपल्या कोंड्ये या गावी कारने (एमएच ०२ / ए के ९९६३) मुंबईहून राजापूरकडे
येत होते. या कारमध्ये ११ जण
होते. त्या वेळी कुवे येथे एका
अवघड वळणावर समोरून आलेल्या एका खासगी आराम बसने (एमएच ०४ / एफआर ५५०८) कारला धडक दिली. दोन्ही गाड्यांची धडक इतकी जोरदार होती की, त्यात कारचा चक्काचूर झाला. त्यामुळे कारमध्ये काही जण अडकून पडले होते. लांजा आणि कुवे येथील तरुणांनी त्यांना बाहेर काढले.
>जखमींवर कोल्हापूर, रत्नागिरीत उपचार
या अपघातात लहू काशीराम उपळकर (१८), अंकुश काशीराम उपळकर (१८), हनुमंत शंकर माजळकर (३५), किरण तरळ (१८), आराम बसचा चालक नितीन शांताराम जाधव (३४, महाड पोलादपूर, रायगड) हे जखमी झाल्याने त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले. याखेरीज क्लीनर संदेश शंकर कांबळे (२१, खावडी, लांजा) हाही यात जखमी झाला असून, त्याच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू आहेत.