चिपळुणात पिसाळलेला कुत्रा सात जणांना चावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:31 AM2021-03-18T04:31:16+5:302021-03-18T04:31:16+5:30
चिपळूण : शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या संख्येने वाढला आहे. येथील वनश्री हॉटेल ते परशुराम नगर परिसरात सायंकाळी ...
चिपळूण : शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या संख्येने वाढला आहे. येथील वनश्री हॉटेल ते परशुराम नगर परिसरात सायंकाळी ४.३० ते ७.३० या कालावधीत पिसाळलेल्या कुत्र्याने सात जणांना चावा घेतला. दोन दुचाकीस्वारांचा पाठलागही केला. सुदैवाने ते यातून बचावले. मात्र, सातपैकी पाच जणांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शहराच्या विविध भागांत सध्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी तर हे कुत्रे जोरजोरात भुंकत लोकांचा पाठलाग करतात. यावेळी काहींचे लहान-मोठे अपघात होतात, तर काहींना हे कुत्रे चावे घेऊन जखमी करतात. गेले आठ-दहा दिवस हे प्रकार सातत्याने घडत आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे.
सोमवारी सायंकाळी वनश्री हॉटेल परिसरात एका कुत्र्याने सात जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आरोग्य विभागात वैभव निवाते यांच्याशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य सांगितले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पिसाळलेल्या कुत्राचा शोध घेऊन त्याला पकडले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.