भास्कर जाधवांच्या बंगल्यावरील हल्लाप्रकरणी तपासासाठी पोलिसांची सात पथके, लवकरच सत्य येणार समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 06:06 PM2022-10-21T18:06:10+5:302022-10-21T18:06:39+5:30

प्रत्येक पथकाला वेगवेगळी ठिकाणे देऊन चौफेर तपास केला जात आहे.

Seven teams of police to investigate the attack on Bhaskar Jadhav bungalow | भास्कर जाधवांच्या बंगल्यावरील हल्लाप्रकरणी तपासासाठी पोलिसांची सात पथके, लवकरच सत्य येणार समोर

भास्कर जाधवांच्या बंगल्यावरील हल्लाप्रकरणी तपासासाठी पोलिसांची सात पथके, लवकरच सत्य येणार समोर

Next

चिपळूण : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या ‘सुवर्णभास्कर’ या बंगल्यावर हल्ल्याचा प्रयत्न प्रकरणात पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. तपासासाठी तब्बल ७ पथके पोलिसांनी तैनात केली असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तसेच सीडीआर पोलिसांनी जमा केले आहेत. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी काही संशयितांची चौकशी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाची उकल होण्याची शक्यता आहे.

आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण पाग येथील ‘सुवर्णभास्कर’ या बंगल्यावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या परिसरात दगड, स्टम्प आणि पेट्रोलच्या बाटल्या आढळल्याने हा थेट हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. हा हल्ला भाजप कार्यकर्ते राणे समर्थकांनी केला असल्याचा थेट आरोप करत आठ संशयितांची नावेही पोलिसांना दिली आहेत. यामध्ये भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

आमदार जाधव यांचे पुत्र समीर जाधव यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी तपासाला वेग दिला आहे. ठसे तज्ज्ञांनी नमुने घेऊन परीक्षणासाठी पाठवले आहेत, तर श्वान पथकाने घराच्या परिसरात किमान २०० मीटर अंतर पिंजून काढला. या प्रकरणी तपास वेगाने व्हावा म्हणून आता पोलिसांची तब्बल ७ पथके तैनात करण्यात आली आहेत.

प्रत्येक पथकाला वेगवेगळी ठिकाणे देऊन चौफेर तपास केला जात आहे. तसेच सुवर्णभास्कर बंगला परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर तपासून ताब्यात घेण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहेत. जाधव यांच्या घराजवळ तसेच कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गेले २ दिवस अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई या चिपळूणमध्ये ठाण मांडून आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता आहे.

आदेश येताच काढला बंदोबस्त

आमदार भास्कर जाधव यांच्यासाठी वाय प्लस स्वरूपाची सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून नेमण्यात आली होती. मात्र, मंगळवारी रात्री साडेदहा वाजता शासनाच्या एसआयडी विभागामार्फत जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा वायरलेस मेसेज आला. त्यानंतर लेखी आदेश येताच, रात्री १२.३० वाजता सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी दिली.

Web Title: Seven teams of police to investigate the attack on Bhaskar Jadhav bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.