सातबारा दुरूस्तीच्या कामाला वेग, रत्नागिरी जिल्ह्याचे ३२ टक्के काम पूर्ण

By admin | Published: March 22, 2017 01:48 PM2017-03-22T13:48:33+5:302017-03-22T13:48:33+5:30

तालुक्याचे ४० टक्के पूर्ण

Seven works of repair work, 32 percent of Ratnagiri districts completed | सातबारा दुरूस्तीच्या कामाला वेग, रत्नागिरी जिल्ह्याचे ३२ टक्के काम पूर्ण

सातबारा दुरूस्तीच्या कामाला वेग, रत्नागिरी जिल्ह्याचे ३२ टक्के काम पूर्ण

Next

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र सर्व्हर मिळाल्याने सातबारा दुरूस्तीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यातील एकूण २० लाख ८० हजार उताऱ्यांपैकी आतापर्यंत ६ लाख ५६ हजार (३२ टक्के) उताऱ्यांमध्ये दुरूस्ती झाल्या असून, रत्नागिरी तालुक्यातील १ लाख २२ हजार ७० (३९ टक्के) उताऱ्यांमधील दुरूस्ती पूर्ण झाली आहे.


राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सातबारा उताऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. उताऱ्यांवरील खातेदारही अधिक आहेत. सातबारा उताऱ्यांचे संणकीकरण झाले असले तरी मूळ उताऱ्यातील दुरूस्ती आॅनलाईन उताऱ्यांमध्ये झालेल्या नाहीत. या उताऱ्यांमध्ये दुरूस्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा दुरूस्तीचे काम जिल्हा प्रशासनाला हाती घ्यावे लागले आहे. राज्यभरच ही स्थिती आहे. मात्र, संगणकीकरणासाठी शासनाककडून आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती करता येत नसल्याने शासनाने ‘एडिट मॉड्युल’ हे दुरूस्तीसाठी असलेले नवे सॉफ्टवेअर सर्व जिल्ह्यांना दिले आहे.


सध्या तालुक्यातील सर्व तलाठी सोमवार वगळून इतर दिवशी तालुक्याच्या ठिकाणी या कामात गुंतले आहेत. प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी सकाळी ७ ते रात्री उशिरापर्यंत सातबारा दुरूस्तीचे काम सुरू झालेले आहे. ‘कनेक्टिव्हीटी’ची समस्या काही अंशी सुटण्यास मदत झाली आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील पूर्वीच्या पुरवठा विभागाच्या कार्यालयात सध्या रत्नागिरी तालुक्यातील ५४ तलाठी सजा आणि नऊ मंडल कार्यालयांच्या सातबारा दुरूस्तीच्या तसेच प्रमाणिकीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात ३ लाख १२ हजार एवढी सातबारा उताऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख २२ हजार उताऱ्यांमध्ये दुरूस्ती झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयकडून आणि भारतीय दूरसंचारच्या सात वाहिनीवरून ‘कनेक्टिव्हीटी’ मिळत असल्याने आता ही समस्या सुटण्यास मदत झाली आहे.


शासनाने एप्रिलअखेर सर्व उताऱ्यांमध्ये दुरूस्ती करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी मध्यंतरीच्या काळात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका झाल्याने या कामातही तलाठीवर्ग गुंतला होता. त्यामुळे उर्वरित उताऱ्यांच्या दुरूस्तीचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Seven works of repair work, 32 percent of Ratnagiri districts completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.