हक्काच्या घरासाठी सात वर्षाच्या ‘रुद्र’चे उपोषण, तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत कुटुंबिय गमावले
By संदीप बांद्रे | Published: May 8, 2023 06:19 PM2023-05-08T18:19:15+5:302023-05-08T18:19:38+5:30
तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत भेंदवाडीतील २२ जणांचा हकनाक बळी गेला
चिपळूण : तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत भेंदवाडीतील २२ जणांचा हकनाक बळी गेला होता. या घटनेत आपले आई वडील आणि बहीण गमावलेला सात वर्षीय रूद्र चव्हाण याला अद्याप घर मिळालेले नाही. त्याचा हक्काचे घर मिळण्यासाठी त्याच्यासह नातेवाईकांनी प्रांत कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू केले आहे. रूद्रच्या पालकत्वाचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने तसेच घराची सोडत काढताना त्यांच्या नातेवाईकांनी रूद्रसाठी घराची मागणी केली नसल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.
तिवरेतील घटनेत रूद्र चव्हाण याचे वडील रणजित, आई ऋतुजा तसेच बहीण दुर्वा हिचा मृत्यू झाला होता. या घटनेवेळी रूद्र चिपळुणातील पेठमाप येथे आत्याकडे वास्तव्यास असल्याने वाचला होता. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळाली. या मदत वाटपावेळी रूद्रच्या पालकत्वाचा वाद सुरू झाला. रूद्रचे चुलते आणि आत्यांनी पालकत्वासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर निर्णय झालेला नाही.
पुनर्वसन अंतर्गत अलोरे येथील घरांच्या सोडतीत रूद्रला घर मिळाले नाही. अशातच सोडत लागलेल्यापैकी सीताराम महादेव रामाणे यांनी तिवरे गावी पुनर्वसन करण्याची मागणी केल्याने घर नं. २१ रिकामे होते. हे घर रूद्रला देण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी येथील प्रांताधिकाऱ्यांना याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे रूद्रचे काका अजित चव्हाण यांच्याकडे या घराची चावी सुपुर्द केली आहे. परंतू, रूद्रची आत्या मनाली संतोष माने हिने त्यावर आक्षेप घेतला आहे. अजित चव्हाण यांनी स्वतःला घर घेताना आधी रूद्रचा विचार करायला हवा होता, असा मुद्दा उपस्थित करून घराच्या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. रूद्र रंजित चव्हाण याच्या सोबत त्याची आत्या मनाली संतोष माने, वैष्णवी विनोद सकपाळ, सुधाकर हरिभाऊ चव्हाण, मधुकर रामभाऊ साळुंखे (आजोबा), मीनल अमित साळसकर (मावशी) उपोषणाला बसले आहेत.