सत्तर वर्षांच्या शेवंती पवार झाल्या बिनविरोध सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:31 PM2021-02-13T12:31:36+5:302021-02-13T12:34:41+5:30
Chiplun sarpanch Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ७० वर्षीय शेवंती बब्या पवार विराजमान झाल्या आहेत. वयोवृद्ध असतानाही गावच्या विकासासाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी झालेल्या पवार यांची इच्छाशक्ती हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे.
चिपळूण : तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ७० वर्षीय शेवंती बब्या पवार विराजमान झाल्या आहेत. वयोवृद्ध असतानाही गावच्या विकासासाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी झालेल्या पवार यांची इच्छाशक्ती हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे.
तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. ओवळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गाव विकास पॅनेलने एकहाती ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दिनेश शिंदे यांनी हॅट् ट्रिक साधली. प्रभाग क्रमांक १ मध्ये सदस्य पदाकरिता अनुसूचित जमाती असे आरक्षण पडले होते. येथील आदिवासी समाजाने ७० वर्षीय शेवंती पवार यांना बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वीही शेवंती पवार यांनी सदस्यपद भूषविले आहे. आता सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. या गावातून अनुसूचित जमाती प्रवर्गातून एकमेव निवडून आलेल्या शेवंती पवार यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे.
गाव विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचे व सरपंच पवार यांचे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी दिनेश शिंदे, निकिता शिंदे, माधवी शिंदे, संपदा बोलाडे, केशव कदम उपस्थित होते.