रत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 12:48 PM2021-02-26T12:48:54+5:302021-02-26T12:52:12+5:30
sex racket Ratnagiri- रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथे एका बंगल्यात सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक पीडित युवतीही पोलिसांना सापडली आहे.
रत्नागिरी : शहरातील ओसवालनगर येथे एका बंगल्यात सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक पीडित युवतीही पोलिसांना सापडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी त्यांना जागा शोधून देणाऱ्या एका ड्रायव्हरलाही ताब्यात घेतले आहे.
परजिल्ह्यांतून मुली आणून त्यांचा वापर हे सेक्स रॅकेट चालविणारे करीत होते. या ठिकाणी शहर परिसरातील अनेक उच्चभ्रू वस्तीतील लोकांची वर्दळ या बंगल्यामध्ये सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला.
शहरामध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची आखणी केली. त्याप्रमाणे बनावट गिऱ्हाईक तयार करून भेटीची वेळ ठरविण्यात आल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी सापळा रचून गुन्हा अन्वेषण शाखेने ओसवालनगरमधील त्या बंगल्यात छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.
पोलिसांनी छापा टाकताच हे रॅकेट चालविणाऱ्या त्या पुरुष आणि महिलेची धावपळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी त्या दोघांना तत्काळ ताब्यात घेतले.
शहरातील रिकामे बंगले भाड्याने घेऊन देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची चर्चा गेले अनेक दिवस शहरात सुरू होती. त्यातच ओसवालनगरमधील देहविक्रीचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये अन्य काहीजण असण्याची शक्यता असून पोलीस तपासानंतर पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली महिला व तिच्यासोबतच्या पुरुषावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होती. ज्यावेळी हा छापा टाकण्यात आला, तेव्हा तेथे एक पीडित युवतीही पोलिसांना सापडली आहे.
पती-पत्नी म्हणून एकत्र
ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, ते दोघेजण पती-पत्नी म्हणून वावरत होते. ते खरोखरच पती-पत्नी आहेत की तोही खोटेपणा आहे, याचा तपासही घेतला जात असल्याचे समजते.
अनेकांची नावे येणार समोर
पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास सुरू केला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांच्या कॉल रेकॉर्डसची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी कोणाकोणाशी संपर्क साधला होता हे समोर येणार आहे. या प्रकरणात बड्या बड्या लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.