रत्नागिरीत तरुणीवर लैंगिक अत्याचार; परिचारिका संतप्त, नागरिकांचा रास्ता रोको
By मनोज मुळ्ये | Published: August 26, 2024 07:06 PM2024-08-26T19:06:59+5:302024-08-26T19:08:10+5:30
रत्नागिरी : परिचारिका म्हणून शिकत असलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी रत्नागिरीत घडली आणि शहर हादरले. परगावाहून ...
रत्नागिरी : परिचारिका म्हणून शिकत असलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी रत्नागिरीत घडली आणि शहर हादरले. परगावाहून आलेल्या तरुणीला गुंगीचे औषध पाजून तिच्यासोबत हा प्रकार करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयातील संतप्त परिचारिकांनी काही काळ काम बंद केले. त्यापाठोपाठ असंख्य रत्नागिरीकर रस्त्यावर उतरले आणि जिल्हा रुग्णालयाबाहेर मुख्य रस्ता अडवण्यात आला. अखेर पोलिसांनी कारवाईची हमी दिल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
बदलापूरमध्ये आणि कोलकाता येथील घटना ताज्या असताना हा प्रकार घडल्याने आता रत्नागिरीही सुरक्षित राहिली नाही का, असा प्रश्न करत असंख्य लोक जिल्हा रुग्णालयात जमा झाले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सोमवारी सकाळी ७ ते सव्वासात वाजेच्या सुमारास ती रत्नागिरीत आली. तेथून घरापर्यंत जाण्यासाठी तिने एका रिक्षाला हात दाखवला. रिक्षात बसताना तिला थोडे मळमळत असल्याने रिक्षा चालकाने तिला पाणी दिले. मात्र, त्यानंतर तिची शुद्ध गेली. तेथून पुढे काय झाले, हे आपल्याला आठवत नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
आपल्याला जेव्हा शुद्ध आली, तेव्हा आपण चंपक मैदानानजीकच्या कचरा टाकल्या जाणाऱ्या भागात होतो, असे तिने पोलिसांना सांगितले. त्यावेळी साडेआठ ते नऊ वाजले होते. तिने तेथून आपल्या आई-वडिलांशी संपर्क साधला. बहिणीशी संपर्क साधला. बहिणीला आपल्या लोकेशनही पाठवले. बहिणीने तिला गर्दीच्या ठिकाणी जाण्याची सूचना केली. तिच्याशी बोलतच ती रस्त्यापर्यंत आली. तेथे एका दुचाकीस्वाराची मदत घेऊन ती चर्मालय येथील चौकापर्यंत आली. तोपर्यंत तिच्या घरच्यांनी त्यांच्या स्नेही व्यक्तीला तेथे पाठवले आणि ते तेथून तिला आपल्या घरी घेऊन गेले. तिचे आई-वडीलही तत्काळ रत्नागिरीत दाखल झाले. साडेदहा वाजेदरम्यान ११२ क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड तातडीने तेथे रवाना झाल्या. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार सर्व ठिकाणांची चाचपणी पोलिसांनी सुरू केली आहे. साळवी स्टॉप ते चंपक मैदान यादरम्यानच्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले जात आहेत. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१) अन्वये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
संतप्त लोकांचा रास्ता रोको
राज्यात, देशात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचीच चर्चा होत असल्याने आणि तसाच काहीसा प्रकार रत्नागिरीत घडल्याने शेकडो लोक शासकीय रुग्णालयात जमा झाले. त्यात सर्वपक्षीय लोक होते. घटना कळल्यानंतर सहा-सात तास झाले तरी पोलिसांनी कोणाला पकडलेले नाही, हाच लोकांचा मुख्य आक्षेप होता. कारवाई जलदगतीने केली जावी यासाठी अखेर या सर्व लोकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर येऊन रास्ता राेको केला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी तत्काळ कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर अखेर जमाव पांगला.