कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचा सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:06+5:302021-08-13T04:35:06+5:30
आरवली : लसीचा पुरवठा अल्प प्रमाणात होत असून, पुढाऱ्यांच्या मर्जीतील लोकांनाच लस दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर ...
आरवली : लसीचा पुरवठा अल्प प्रमाणात होत असून, पुढाऱ्यांच्या मर्जीतील लोकांनाच लस दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत घडत आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांना मात्र पहिल्या डोसनंतर १३५ दिवस उलटूनही लस मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात दशक्रोशीतून लोक येतात. लसीकरणासाठीही याठिकाणी ग्रामस्थांची गर्दी हाेत आहे. मात्र, त्याप्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अपंग व वृद्धांना सहा ते सात हेलपाटे मारूनही लस मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याठिकाणी येणारी लस पुढाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना दिली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लसीसाठी ग्रामस्थ पहाटे ५ वाजल्यापासून नंबर लावतात. मात्र, योग्य नियोजन नसल्याने ग्रामस्थांना नऊ - नऊ तास रांगेमध्ये उभे राहूनही लस न घेताच माघारी फिरावे लागत आहे.
कडवई प्राथमिक केंद्रात साेमवारी २० डोस येणार असल्याचे समजताच पहिल्या डोससाठी जवळजवळ ४० तर दुसऱ्या डोससाठी २५ लोकांनी पहाटेपासून नंबर लावले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १० वाजता आलेल्या लोकांना फक्त दहाच डोस आले असून, ते प्राधान्याने दुसऱ्या डोससाठी जास्त दिवस झालेल्या लोकांनाच दिले जातील, अशी माहिती दिली. त्यामुळे इतर लोकांना परत पाठविण्यात आले. मात्र, काहीवेळाने रांगेत नसलेले ग्रामस्थ केंद्रातून डाेस घेऊन बाहेर येत हाेते. त्यामुळे त्यांना डाेस काेठून मिळाले, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, वीस डोस कुठे गेले, याची माहिती देण्यास आराेग्य विभागाने असमर्थता दर्शवली.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका लोकप्रतिनिधीच्या शिफारशीवरून लगतच्या एका ग्रामपंचायतीत पहिल्या डोससाठी ४० डोस आल्याची चर्चा सुरू आहे. दुसऱ्या डोससाठी अनेक लोक पात्र असताना पहिल्या डोससाठी चाळीस डोस दुसऱ्याच दिवशी उपलब्ध झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी तालुका आरोग्य अधिकारी एस. एस. सोनवणे यांना माहिती दिली. त्यावर त्यांनी याविषयी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.